नाशिक : देशात गेल्या काही दिवसात करचोरीची मोठी प्रकरणं समोर आली आहेत. आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत कोट्यावधींची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यातही आयकर विभागाने मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली. आयकर विभागाने नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईतही कोट्यावधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांतून 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. सलग पाच दिवसात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत कोट्यावधींच्या रोख रकमेसह मौल्यवान दागिने जप्त केले आहेत.
या करचुकवेगिरी करणाऱ्यांमध्ये सरकारी कंत्राटदार, बिल्डर, व्यावसायिक इत्यादींचा सामावेश आहे. 22 गाड्यांमधून 175 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी मोठा पोलीस फौजफाटाही तैनात होता.