नाशिक: मराठा समाजाच्या आरक्षणा वरून आज नाशिकमध्ये भाजप आमदारांनीं राजीनामा देण्याची स्टंटबाजी केली. आपणही मराठा समाजासोबतच आहोत हे दाखवण्यासाठी आमदार सीमा हिरे आणि राहुल आहेर यांनी मराठा क्रांती मोर्चाकडे आपले राजीनामे सुपूर्द केले.
कायद्याने जर कुठल्याही आमदाराला राजीनामा द्याचा असेल तर तो विधानसभा अध्यक्षाना द्यावा लागतो. मात्र, त्यामुळे सीमा हिरे आणि राहुल आहेर यांच्या राजीनामानाट्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्यासह राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्यासह अण्णाभाऊ साठे महामंडळात गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरूंगात असलेले आमदार रमेश कदम यांनीही आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आमदारकीचे राजीनामे दिले होते.