देव आनंदचा बेफिक्रीचा धुवाँ...

मंदार मुकुंद पुरकर देव आनंदची कारकिर्द ऐन बहरात असताना त्याच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन करताना चपखलपणे लागू होईल असं त्याला देखील वाटलं नसेल. देव आनंदने गेली तीस वर्षाहून अधिक काळ एका मागून एक फ्लॉप सिनेमांची निर्मिती करण्याचे विलक्षण सातत्य राखलं आहे.

Updated: Oct 22, 2011, 02:58 PM IST

मंदार मुकुंद पुरकर

mandar.purkar@zeenetwork.com

 

 हर फिक्र को धुऐ में उडाता चला गया

मै जिंदगी का साथ निभाता चला गया...

 

देव आनंदची कारकिर्द ऐन बहरात असताना त्याच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन करताना चपखलपणे लागू होईल असं त्याला देखील वाटलं नसेल. देव आनंदने गेली तीस वर्षाहून अधिक काळ एका मागून एक फ्लॉप सिनेमांची निर्मिती करण्याचे विलक्षण सातत्य राखलं आहे. यात भर पडली आहे ती गेल्या काही दिवसापूर्वी रिलीझ झालेल्या त्याच्या चार्जशीट या सिनेमाची.

 

गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फ्लॉपच्या विक्रमी संख्येकरता देव आनंदचे नाव समाविष्ट होऊ शकेल. देव आनंद यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाऊन देखील प्रत्येक वेळेस निर्मिती करता पैसे कुठून उभे करतो, याचं अनेकांना कुतुहूल आहे.

 

पण देव आनंदच्या नावाची जादू ओसरलेली नाही, त्याचे चाहते आजही त्याच्या जीव ओवाळून टाकायला तयार असतात. आणि त्यात परदेशस्थ भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच देव आनंदच्या सिनेमांना परदेशातील भारतीय मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवतात. मग त्यातून फायदा होवो किंवा न होवो. केवळ देव आनंद सोबत आपलं नाव जोडलं जावं यासाठी अनेकजण आनंदाने पैशाचे पाठबळ देतात.

 

देव आनंदने आपल्या भरभराटीच्या काळातील कमाईतून मुंबईभर अनेक ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे आणि त्यातून त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो. तसंच देव आनंदचा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे त्यातूनही घशघशीत उत्पन्न मिळतं. देव आनंदने केलेल्या नियोजनबध्द गुंतवणुकीमुळे अजूनही शंभर एक फ्लॉप सिनेमांच्या निर्मितीने त्याला फारसा फरक पडणार नाही. देव आनंदच्या सिनेमातून अनेकांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे आणि हे कलाकार त्याच्या सिनेमात विना मोबदला काम करण्यास तयार असतात.

 

एकेकाळी देव आनंदच्या नवकेतन बॅनरने एकाहून एक उत्कृष्ट सिनेमांची निर्मिती करुन हिंदी सिनेसृष्टीच्या वैभवात भर टाकली होती. नवकेतनचे सोनेरी दिवस कधीच इतिहास जमा झाले. खरंतर हरे राम हरे कृष्णच्या निर्मितीनंतर देव आनंदने काळ बदलला आहे याचं भान राखत निवृत्ती पत्करली असती तर संयुक्तीक ठरलं असतं. पण अनेकदा अनेकांना आपण आता थांबलं पाहिजे हे उमगत नाही आणि मग ते स्वतःचे हसं करुन घेतात. देव आनंदने देखील स्वतःवर ही वेळ ओढावून घेतली आहे.

 

आजही देव आनंदला आपला काळ सरला आणि मनाने असलो तरी शरीराने तरुण नाही हे वास्तव स्वीकारता आलेलं नाही. त्यामुळेच आजही तो नायकाच्या भूमिका साकारण्याचा केविलवाणा अट्टाहास करताना दिसतो. खरतरं एकदा त्याने पन्नास आणि साठच्या दशकाताले स्वतःचे सिनेमे पाहावेत आणि आपण स्वतःचं वाटोळं (आर्थिक नव्हे, इमेज भाई इमेज) का करुन घेत आहोत असा प्रश्न स्वतःला आता तरी एकदा विचारुन पाहावा.