मुंबई : २०१५ हे वर्ष मोबाईल युझर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात स्मार्टफोन आणखीन 'स्मार्ट' झाले. अनेक नवनव्या सुविधा ग्राहकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळाल्या... एक नजर या बदलांवर
'अॅपल'चे आयफोन ६ एस, ६ एस प्लस 'थ्री डी टच'सहीत!
सप्टेंबर २०१५ मध्ये टीम कूकनं आपले अपडेटेड स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत उतरवले. आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस हे स्मार्टफोन मोठ्या स्क्रीन डिस्प्लेसहीत दिसले. या स्मार्टफोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पहिल्यांदाच 'थ्री डी टच' देण्यात आला होता.
भारतामध्ये हे स्मार्टफोन १६ ऑक्टोबर रोजी दाखल झाले. १६ जीबी इनबिल्ट मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत होती ६२ हजार रुपये.
मायक्रोसॉफ्ट विंडोज १०
जुलै २०१५ मध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम Win ७, Win ८ & Win ८.१ नंतर मायक्रोसॉफ्टनं आपलं नवीन ऑपरेटिंग सिस्टम 'विंडोज १०' प्रदर्शित केलं. याआधी फोन, टॅब्लेट, लॅपटॉप, पीसी अशा प्रत्येक डिव्हाइससाठी वेगळी सॉफ्टवेअर बनवावी लागायची मात्र विंडोज १० या सर्व डिव्हाइसना सपोर्ट करणारं होतं. यामध्ये कोर्टाना इंटिग्रेशन, स्पार्टन ब्राऊजर, सर्फेस हब (84 इंच 4K डिस्प्ले), विंडोज होलोग्राफिक असे फिचर्स होते.
गूगल आणि अॅपलच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ही खेळी मायक्रोसॉफ्टच्या चांगलीच पथ्यावर पडली.
मायक्रोसॉफ्टचे स्मार्टफोन आणि लॅपटॉप
ऑक्टोबर २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टनं आपला पहिला वहिला लॅपटॉप बाजारात उतरवला. 'सरफेस बूक' हा अॅपलच्या 'मॅकबूक प्रो'पेक्षा दुप्पट फास्ट असल्याचा दावा यावेळी मायक्रोसॉफ्टनं केला.
याशिवाय कंपनीनं 'सरफेस प्रो' हा टॅबलेट आणि ल्युमिया ९५०, ल्युमिया ९५० XL हे स्मार्टफोनदेखील बाजाराच्या स्पर्धेत उतरवले.
कॅमेरा कंपनी 'कोडॅक'ची 'स्मार्टफोन'मध्ये एन्ट्री
सरत्या वर्षात 'कोडॅक'नं आपली एक नवी चेहरा बाजारासमोर ठेवला. कॅमेरा कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडॅकनं आपला पहिला वहिला स्मार्टफोन बाजारात उतरवला. लास वेगास इथं भरलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो, २०१५ मध्ये कोडॅकनं अॅन्ड्रॉईडसही आपला 'एमआय ५' हा स्मार्टफोन लॉन्च केला.
गूगल अॅन्ड्रॉईडचं 'मार्शमॅलो'
ऑगस्ट २०१५ मध्ये, गूगलनं आपल्या अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचं सहावं व्हर्जन उघड केलं... हे नवीन व्हर्जन 'मार्शमॅलो' अॅप डेव्हलपर्सना टेस्टिंगसाठी देण्यात आलंय... त्यामुळे सध्या तरी 'मार्शमॅलो' यूझर्सपर्यंत पोहचलेलं नाही.
फिंगर सेन्सर, दीर्घकाळ बॅटरी, अॅप परमिशन असे अनेक फिचर्स 'मार्शमॅलो'मध्ये देण्यात आलेत.
सॅमसंगचे स्मार्टफोन्स
साऊथ कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं सरत्या वर्षात आपले तब्बल तीन स्मार्टफोन बाजाराच्या स्पर्धेत उतरवले. गॅलक्सी नोट ५, गॅलक्सी एस ६ आणि गॅलक्सी एस ६ एज हे ते तीन स्मार्टफोन आहेत.
तर ऑगस्ट महिन्यात 'सॅमसंग'नं आपला 'नोट ५' जगासमोर सादर केला. 'नोट ५' भारतात आला तो सप्टेंबर महिन्यात... ३२ जीबीच्या 'नोट ५'ची भारतातली सुरुवातीची किंमत होती ५३,९९९ रुपये.
गॅलक्सी एस ६ आणि गॅलक्सी एस ६ एज एप्रिल महिन्यात लॉन्च झाले. यांची सुरुवातीची किंमत होती ४९,९०० रुपये.
आसुसचे स्मार्टफोन
तैवानची हँडसेट बनवणाऱ्या 'आसुस' या कंपनीनं ऑगस्टमध्ये दिल्लीत भरलेल्या झेनफेस्टमध्ये आपले तब्बल चार स्मार्टफोन लॉन्च केले. झेनफोन २ डिलक्स, झेनफोन २ सेल्फी, झेनफोन २ लेझर आणि झेनफोन मॅक्स हे ते स्मार्टफोन...
यापैंकी झेनफोन २ डिलक्सची किंमत सर्वात जास्त म्हणजे २२,९९९ रुपये होती.... तर झेनफोन मॅक्सची किंमत होती ९,९९९ रुपये.
आसुस, श्याओमीची मेक इन इंडियामध्ये एन्ट्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कम... मेक इन इंडिया' या आवाहनला प्रतिसाद देत चायनीज हॅडसेट मेकिंग कंपनी श्याओमी आणि तैवानच्या आसुसनं आपले स्मार्टफोन भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला.
या दोन कंपन्यांनी 'फॉक्सकॉन' या आणखी एक तैवानच्या कंपनीला हाताशी घेऊन भारतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलंय.
दरम्यान, श्याओमीनं आपला पहिला वहिला 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन 'रेडमी २ प्राईम' सादर केलाय.