नवी दिल्ली : (जयवंत पाटील, झी, २४ तास ) नेट न्यूट्रॅलिटीवरून फ्लिपकार्टने एअरटेलची साथ सोडली आहे, नेट न्यूट्रॅलिटीवर नेटकऱ्यांनी टाहो फोडला असतांना, एअरटेलसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. फ्लिपकार्टने अधिकृत स्पष्टीकरण देऊन याविषयी माहिती दिली आहे.
'फ्लिपकार्ट'चं अधिकृत स्पष्टीकरण
स्वत:ला एअरटेलच्या झिरो प्लानमधून वेगळ करतांना फ्लिपकार्टने म्हटलं आहे, फ्लिपकार्ट नेट न्यूट्रॅलिटीमध्ये विश्वास करतं, आणि केवळ या मुळेच आम्ही डिजिटल युगात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. मागील काही वर्षांपासून झिरो प्लानशी संबंधित मुद्यावर, मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
न्यूट्रॅलिटी राहिली नाही तर भविष्यात आम्हालाही अडचणींचा सामना करावा लागेल, याची कल्पना आम्हाला आहे. यावरून एअर टेलच्या झिरो प्लानमधून आम्ही स्वत: वेगळे राहण्याचा निर्णय घेत आहोत, असं अधिकृत स्पष्टीकरण फ्लिपकार्टने दिलं आहे.
प्लिपकार्ट-एअरटेल झिरो प्लानचा नेमका वाद काय?
देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने मोफत इंटरनेट प्लान 'एअरटेल झिरो' लॉन्च केला. यावरून भारतात याविषयावरून चर्चा सुरू झालीय. या प्लान नुसार ग्राहक एप्लिकेशन्सला कोणताही डेटाचार्ज न करता वापरू शकतो. मात्र ग्राहक या प्लानवर त्याच वेबसाईटला ब्राऊज किंवा डाऊनलोड करू शकणार आहे, जी वेबसाईट, किंवा अॅप एअरटेल सोबत रजिस्टर्ड असेल.
एअरटेल या प्लानमध्ये रजिस्टर होणारी पहिली कंपनी होती, मात्र असं केल्याने युझर्स फ्लिपकार्टची रेटिंग कमी करत होते. यामुळे फ्लिपकार्टने नेट न्यूट्रॅलिटीवर आपली भूमिका स्पष्ट करत, स्वत:ला एअरटेलच्या झिरो प्लानमधून वेगळं केलं.
काय आहे नेट न्यूट्रॅलिटी?
नेट न्यूट्रॅलिटी एक असं तत्व आहे, ज्यात इंटरनेट कंपन्या, आणि सरकार प्रत्येक प्रकारचा डेटा, एका समान स्वरूपात ग्राहकांना देतील, युझर्सकडून प्रत्येक एप्लिकेशन किंवा इंटरनेट ब्राऊज करतांना एक सारखा दर आकारला जाईल.
सध्या एप्लिकेशन वापरतांना आपल्याला एकच इंटरनेट प्लान हवा आहे, मात्र जर झिरो प्लान लागू केला, तर प्रत्येक अॅप्ससाठी तुम्हाला वेगवेगळा प्लान द्यावा लागेल, आणि पैसेही भविष्यात मोजावे लागतील.
ट्रायने सध्या नेट न्यूट्रॅलिटीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही, ट्रायने नेट न्यूट्रॅलिटीवर टेलिकॉम कंपन्यांशी २४ एप्रिलपर्यंत आणि युझर्सकडून ८ मे पर्यंत मतं मागवली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.