www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदवर फेसबुर कमेंट करणा-या दोन मुलींच्या अटकप्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाही. या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत जाणकारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत.
पालघर येथील शाहीन धाडा आणि रितू श्रीनिवासन यांना रविवारी अटक झाल्यानंतर पोलिस आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. अॅड. आभा सिंह यांनी तर याप्रकरणी थेट महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडून मागवला होता.
त्यानुसार कोकण पोलिस महानिरीक्षक सुखविंदरसिंग यांना चौकशी अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. या अहवालामुळे दोन्ही मुलींची गुन्ह्यांतून सुटका होणार असून आता पालघर पोलिसांवरील कारवाई मात्र अटळ मानली जात आहे .
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उत्सफुर्त मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदची काय गरज होती, असा सवाल फेसबुकवर विचारणा-या आणि या पोस्टला लाइक करणा-या अशी दोन मुलींना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कार दिवशी बंदची काय गरज होती, असा प्रश्न एका मुलीने उपस्थीत केला होता. या पोस्टला तिच्या मैत्रीणीने लाइक केले होते. या संदर्भात काही शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही तासातच या दोघींना अटक केली होती. या दोन मुलींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती.