www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विमा पॉलिसी घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर `एचआयव्ही`ची बाधा झाली तरी त्या कारणावरून पॉलिसी संपल्यानंतर त्या व्यक्तीचा पॉलिसीच्या पैशांचा दावा अमान्य करू नये, असे निर्देश विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) देशातील सर्व आयुर्विमा कंपन्यांना जारी केले आहेत.
`एचआयव्ही` अथवा `एड्स`ग्रस्त व्यक्तींना विविध प्रकारच्या आयुर्विमा पॉलिसी विकण्यासंबंधी प्रत्येक कंपनीने आपल्या संचालक मंडळाकडून निश्चिात असे धोरण मंजूर करून घ्यावे, असेही `इरडा`ने सांगितले आहे. हे नवे निर्देश १ एप्रिल २०१४ पासून विकल्या जाणाऱ्या पॉलिसींना लागू होणार आहेत. सध्या पॉलिसीधारकाने पॉलिसी घेताना आपला आजार उघड केला नसेल, तर विमा कंपनी पॉलिसीचे पैसे देण्यास नकार देतात.
मात्र `एचआयव्ही`ची बाधा झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत यास अपवाद ठरवण्यात येणार आहे. पॉलिसी घेतल्यानंतर एड्स झाला तरी त्यांना पॉलिसीचे पैसे दिले जावेत, असे आयुर्विमा कंपन्यांना आता सांगण्यात आले आहे. अशा सर्व प्रकरणांमध्ये पॉलिसी घेताना लागू असलेल्या `अंडररायटिंग` व `क्लेम सेटलमेंट गाईडलाइन्स` दाव्याच्या वेळीही लागू राहतील, असे `इरडा`ने स्पष्ट केले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.