www.24taas.com, झी मिडिया, नागपूर
राज्यातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पोलीस दलात नव्यानं १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याय.
हिवाळी अधिवेशनात गृहखात्यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी अपुरे पोलीस बळ असल्यामुळं गुन्ह्यांचा तपास लागत नाही, त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं, लोकसंख्येच्या मानानं पोलिसांची संख्या नाही असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्यात नव्यानं ६१ हजार पोलिसांची पदं निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यातील १० हजार पोलिसांची भरती तातडीनं करण्यास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यांवर पडणारा कामाचा ताण लक्षात घेता ज्या भागात गुन्ह्यांचं प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १२१ नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.