'हर्ले डेविडसन' क्लबचा अनोखा अंदाज...

हर्ले डेविडसन... बाईक जगतातलं प्रसिद्ध नाव... हर्ले डेविडसनची सवारी रस्त्यावरून निघाली की कोणाचंही लक्ष वेधून घेते. एक-दोन नाही तर तब्बल चाळीस हर्ले डेविडसन एकाच वेळी रस्त्यावरून निघाल्या तर... हे दृश्य पाहण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली.

Updated: May 20, 2012, 07:07 PM IST

www.24taas.com, पुणे

हर्ले डेविडसन... बाईक जगतातलं प्रसिद्ध नाव...  हर्ले डेविडसनची सवारी रस्त्यावरून निघाली की कोणाचंही लक्ष वेधून घेते.  एक-दोन नाही तर तब्बल चाळीस हर्ले डेविडसन एकाच वेळी रस्त्यावरून निघाल्या तर... हे दृश्य पाहण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली.

पुणेकरांसाठी आजचा रविवार वेगळा ठरला. काही दिवसांपूर्वी, पुण्यात असा एकही बाईक क्लब नव्हता. पुण्यातले हर्ले डेविडसनधारक मुंबईच्या क्लबशी सलग्न होते. त्यासाठी त्यांना मुंबईला जावे लागे. त्यातून पुण्यामध्येच असा क्लब स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. आणि इथल्या काही बाईक वेड्यांनी ‘हर्ले डेविडसन’ या बाईक क्लबची स्थापना केलीय. त्यानिमित्तानं या तरुणांनी पुण्यात रॅली काढली. विशेष म्हणजे या क्लबनं रॅलीतून रस्ता सुरक्षेचा संदेशही दिला.

हर्ले डेविडसन जेवढी आकर्षक तेवढीच तिची किंमतदेखील डोळे चक्रावणारी आहे. ८ लाखांपासून ते ४० लाखांपर्यंत या बाईकच्या किंमती आहेत. ही बाईक पाहण्यासाठी गर्दी होत असल्यानं क्लबने प्रत्येक रॅलीतून एखादा सामाजिक संदेश देण्याचा निर्णय घेतलाय. ठराविक कालावधीनंतर पुणे आणि परिसरात अशी रॅली काढली जाईल, असं हर्ले डेवडसन क्लबचा संयोजक विशाल पवार यानं सांगितलं. ही महागडी बाईक सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. मात्र, या बाईकचा उपयोग करून हा क्लब चांगले संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही त्यानं यावेळी व्यक्त केला.