ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 13, 2014, 03:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.
एक कोटी लोकसंख्या आणि ९,५५८ चौ. किमी असं क्षेत्रफळ असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नवा पालघर जिल्हा उदयाला येणार आहे. राज्य सरकारने यावर आज शिक्कामोर्तब केलंय.
अखेर देशातला सर्वात मोठा जिल्हा असणा-या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या निर्णयानुसार अखेर पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
प्रशासकीय प्रक्रियेच्या सुलभतेसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमत्री विधीमंडळात आज घोषणा करणार आहेत. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल १ कोटींच्या घरात होती. तर ९ हजार ५५८ चौरस किमी एवढं प्रचंड क्षेत्रफळ ठाणे जिल्ह्याचं होतं. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या नागरिकांना जिल्हा मुख्यालयात म्हणजे ठाणे शहरात येण्यासाठी प्रचंड अंतर कापावं लागत असे.
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे. जिल्हा विभाजनाच्या मागणीवरून ठाणे जिल्ह्यात आजवर अनेक आंदोलनं झाली.
जिल्ह्याचं विभाजन होणार की त्रिभाजन यावरूनही अनेक खल झाले. नव्या जिल्ह्याचं मुख्यालय जव्हार असावं की पालघर यावरूनही अनेक मतमतांतरं होती. अखेर सरकारने आज पालघर जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.