www.24taas.com, झी मीडिया, अंबरनाथ
विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना आठवीतल्या निशांतला विजेचा मोठा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याने आपले दोन्ही हात गमावले. मात्र, निशांत खचला नाही. त्याची शिकण्याची इच्छा कायम आहे. कृत्रिम हात बसवून निशांतचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याचे कुटुंबीय प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.
निशांत गायकवाड... अंबरनाथच्या भाऊसाहेब परांजपे विद्यालयात तो इयत्ता आठवीत शिकतो. सर्वसामान्य सुखवस्तू कुटुंबातील मुलांसारखं त्याचं आयुष्य जात होतं. पतंग उडवण्याची आवड अशी जीवघेणी ठरेल, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. १९ ऑगस्ट २०१३ हा दिवस त्याच्या आय़ुष्यातला काळा दिवस ठरला.
आपल्या घराच्या गच्चीवरून उडणारा पतंग बांबूच्या सहाय्याने तो पकडत होता. ओल्या बांबूचा स्पर्श घरावरून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांना झाला आणि निशांतला विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत निशांतचे दोन्ही हात जळाले. त्यानंतर निशांतला मुबईच्या केईएम रुग्णालयात भरती करण्यात आलं. तीन महिन्यांत निशांतच्या दोन्ही हातावर डॉक्टरांनी पाच शस्त्रक्रिया केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी निशांतचे दोन्ही हात कापायला लागले. एवढ्या मोठ्या धक्क्यातून निशांत डगमगला नाही... शिकायचं... शाळेत जायचं... मोठं व्हायचं, हे त्याचं त्याच्या डोळ्यांत कायम आहे.
मात्र, या घटनेने गायकवाड कुटुंबावर दु:खाचं आभाळ कोसळलंय. डॉक्टरांनी निशांतला जापनीज तंत्रज्ञानाचे कृत्रिम हात बसवण्यासाठी १० ते १२ लाखांचा खर्च सांगितला आहे. कृत्रिम हातामुळे निशांत त्याच्या हाताचा ४० टक्के वापर करू शकतो आणि स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. आपल्या मुलाला कृत्रिम हात बसून त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याचे कुटुंबीय प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.
आत्तापर्यंत निशांतच्या उपचारांसाठी तीन लाख रुपयांचा खर्च झालाय. आता आणखी १० ते १२ लाख रुपये कसे जमवायचे? हा मोठा प्रश्न गायकवाड कुटुंबीयांना पडलाय. चांगल्या कामांसाठी आजही मदतीचे अनेक हात पुढे येत असतात, निशांतला अशीच मदत मिळेल आणि त्याच्या हातांना बळ मिळेल, अशी आशा करुया...
निशांतच्या मदतीसाठी निशांतचे वडील शशिकांत गायकवाड यांना तुम्ही - ९२६०६१९५९६ या नंबरवर संपर्क साधू शकता
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.