www.24taas.com, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाला लागूनच असलेलं हे आहे शंकरराव झुंझारराव उद्यान... पूर्वीपासून या उद्यानाबाबत नागरिकांची ओरड आहे. हे उद्यान म्हणजे गर्दुल्ले, जुगारप्रेमी आणि अश्लील चाळे करणाऱ्यांचा अड्डा बनलाय. त्यामुळे इथं यायला सुसंस्कृत कल्याणकरांना लाज वाटते, अशा संतप्त प्रतिक्रिया झी २४ तासकडे व्यक्त झाल्यात.
मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीही उद्यानांच्या दूरवस्थेबाबत खंत व्यक्त केलीय. उद्यानांवर लाखो रुपये खर्च होतात, मात्र तरीही बगिचे असे का? असा सवाल त्यांनी केलाय.
‘झी २४ तास’नं याप्रकरणी महापौरांना विचारणा केली. महापौर आणि आमदार निधीतून या उद्यानाचं लवकरच सुशोभीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. विशेष म्हणजं इथं सुरक्षारक्षकही नेमला जाणार आहे, असं स्पष्टीकरण कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी दिलंय. उद्यानं, मोकळी मैदानं म्हणजे शहरांचा श्वास... त्याकडेच प्रशासनाचं दूर्लक्ष होतंय. आता सुशोभीकरणाचा निर्णय कधी अंमलात येतोय आणि सामान्य कल्याणकरांना या उद्यानाचा लाभ कधी मिळणार हे पहायचं.