www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
आत्ता वेबसाईट किंवा फोनवरून विमानाचे तिकीट बुक करण्याचे दिवस संपलेत... ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात विमान कंपन्यांनी सोशल मीडियाला हाताला धरून एक पाऊल पुढे टाकलंय.
वॉशिंग्टन पोस्टच्या एका अहवालानुसार, `स्प्रिंकलर` कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रागी थॉमस यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक ग्राहकाशी संवाद कायम करण्यासाठी विमान कंपन्या ज्या प्रकारे फोनचा वापर करतात त्याचप्रकारे त्या सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. याची उपयोगिता वादातीत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक विमान कंपन्यांनी ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरही आपली उपस्थिती लोकांसमोर आणलीय.
`इलिनोईस`च्या विमान कंपनी `युनायटेड एअरलाइन्स` तसंच केएलएम आणि नेदरलँडची कंपनी `रॉयल डच एअरलाईन्स`नं २००९ अनौपचारिक स्वरुपात सोशल मीडियाचा वापर सुरू केला होता. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर एका वर्षांतच या कंपन्यांनी औपचारिक स्वरुपात सोशल मीडियाचा वापर सुरू केला.
आज नेदरलँडच्या कंपनीसाठी १३५ सोशल मीडिया एजंट काम करत आहेत... १० भाषांमध्ये निपुन असणारे हे मीडिया एजंट प्रवाशांना २४ तास सेवा उपलब्ध करून देतात. तसंच अटलांटाची कंपनी डेल्टा एअरलाइन्सनं २००६मध्ये ट्विटरवर `अॅट द रेट ऑफ डेल्टाअसिस्ट` लॉन्च केलंय.
दुबईची कंपनी `एमीरेट्स एअरलाइन्स`नं यंदा २५ मार्च रोजी आपलं ट्विटर हँडल लॉन्च केलं आणि प्लॅनेट ट्विटरवर पहिल्याच आठवड्यात १७ ट्विट पाठवले. `एअरलाईन ट्रेंडस् डॉट कॉम`चे संस्थापक रेमंड कोल्लौ यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियाला आपलसं करण्यात विमान उद्योग सर्वात पुढे आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.