www.24taas.com, लंडन
फेसबुकवर एखाद्याचं स्टेटस बदलणं किंवा मित्रांच्या मोबाइलवरून वाह्यात मॅसेज करणं हे आजच्या तरुण पिढीला एकादा जोक सांगण्यापेक्षा जास्त मजेशीर वाटतं, असं सर्वेक्षण इंग्लंडमधील एका संस्थेने केलं आहे.
अशा प्रकारची मस्ती करण्यामध्ये १८ ते २४ वर्षं वयोगटातल्या तरुणांची संख्या मोठी आहे. सर्वेक्षणातील सुमारे ४०% लोकांनी आपण अशा प्रकारची मस्ती करत असल्याचं मान्य केलं आहे. जुने कंटाळवाणे जोक्स ऐकण्यापेक्षा आणि सांगण्यापेक्षा अशा प्रकारचे वास्तव जोक्स घडवण्यात तरुणांना जास्त मजा येत असल्याचं डेली एक्सप्रेसने प्रसिद्ध केलं आहे.
गंमत म्हणून अनोळखी माणसाला कॉल करून त्यांची थट्टा करण्यापेक्षा आता दुसऱ्यांच्या नंबरवरून तिसऱ्याला अश्लील मॅसेज पाठवणं हा जास्त गमतीदार जोक ठरू लागला आहे. ६७% लोकांनी मान्य केलं, की त्यांचं फेसबुक स्टेटस भलत्याच कुठल्यातरी व्यक्तीने त्यांना न सांगता बदलून टाकलं होतं.
यापूर्वी फोटोबाँबिंग हा प्रकार मस्ती म्हणून जास्त प्रमाणावर केला जात असे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे फोटो काढले जात असताना नेमक्या क्षणी फोटोग्राफर आणि ज्याचे फोटो काढले जात आहेत, ती व्यक्ती यांच्यामध्ये उडी मारून फोटो बिघडवणं हा सर्वांत लोकप्रिय थट्टेचा प्रकार होता. मात्र आता दुसऱ्याच्या मोबाइलवरून मॅसेज करणं हा गमतीचा भाग विशेष प्रसिद्ध होत आहे. ७५ टक्के पुरूष असा प्रकार करतात, तर ६१ टक्के स्त्रिया अशा प्रकारचे विनोद करतात.