www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनची राजधानी बीजिंगमध्ये मंगळवारी ‘ओप्पो’ या मोबाईल कंपनीनं आपला सर्वांत सडपातळ ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘आर 3’ असं या आर सीरिजमधल्या मोबाईलचं नाव आहे.
अवघा ६.३ मिमी एवढा सडपातळ असलेला हा स्मार्टफोन क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन ४०० प्रोसेसरवर चालतो. यामध्ये अॅन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टमचा वापर करण्यात आला असून त्यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे.
या स्मार्टफोनच्या ८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅशचीही सुविधा देण्यात आलीय. त्यामुळे अंधारातही चांगले फोटो काढता येऊ शकतात. तसंच यामध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही उपलब्ध आहे. या फोनमध्ये एक नवीन सुविधा ग्राहकांना वापरता येणार आहे... ती म्हणजे, व्हिडिओ फीचर... यातून यूजर्स फोटो आणि व्हिडिओ एकत्र करुन ऑनलाइन अपलोड करू शकतात.
या फोनची आणखी वैशिष्ट्यं म्हणजे, ३.५ ऑडिओ जॅक, ८०२.११ वाई- फाई, ब्लूटूथ ४.०, जीपीएस, थ्रीजी आणि फोर जी कनेक्टीव्हिटी अशा सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यात. फोनमधील बॅटरी २४२० मेगाहर्टझची आहे ज्यामुळे ग्राहकांना जास्त टॉक- टाईम मिळू शकतो.
हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलाय. या ४जी स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये २२९९ युआन (२१,८८०रुपये) एवढी निश्चित करण्यात आलीय. परंतु, हा फोन भारतामध्ये कधी येईल, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.