www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या महिन्यात काही ‘हॅकर्स’ फेसबुक हॅक केलं होतं, अशी माहिती सोशल मीडिया नेटवर्कींग साईट खुद्द फेसबुकनंच दिलीय. परंतू, कोणत्याही ‘फेसबूक यूजर’च्या कोणत्याही माहितीला धक्का लागला नसल्याचा निर्वाळाही फेसबुकनं दिलाय.
फेसबुकच्या म्हणण्यानुसार, फेसबुकच्या एका कर्मचाऱ्यानं असुरक्षित मोबाईल डेव्हलपर वेबसाईटचा वापर केला होता. त्याचा फायदा उठवत हॅकर्सनं फेसबुकमध्ये शिरकाव केला. पण, अशा पद्धतीनं हॅकर्सच्या निशाण्यावर आलेली फेसबुक ही काही पहिलीच कंपनी नाही.
जगभरात एक अरबपेक्षा जास्त लोक सध्या फेसबुकचा वापर करत आहेत. ‘मागच्या महिन्यात फेसबुकच्या सुरक्षा व्यवस्थेच्या हे लक्षात आलं होतं, की कुणीतरी आधुनिक पद्धतीनं वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करतंय. कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर मॅलवेअर डाऊनलोड झालं होतं. मॅलवेअर हे एक सॉफ्टवेअर आहे, ज्याचा वापर हॅकिंगसाठी केला जातो. त्यामुळे कम्प्युटरमधून सिक्रेट डाटाही हॅक करता येऊ शकतो. किंवा त्याचा वापर कम्प्युटर निकामी करण्यासाठी केला जातो. आम्हाला ही गोष्ट समजल्यानंतर आम्ही लगेचच सावध झालो आणि आमच्या सुरक्षा यंत्रणेला सूचित केलं. त्यामुळे पुढील धोका टळला’ असं फेसबुकनं म्हटलंय.
हॅकर्सला शोधून काढण्यासाठी फेसबुकनं चौकशीही सुरू केलीय. अनेक चर्चित वेबसाईट सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला ट्विटरनंही आपल्या जवळपास २ लाख ५० हजार युजर्सचा पासवर्ड चोरी झाल्याची माहिती दिली होती. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल सारख्या मीडियानं हॅकिंगसाठी चीनला टार्गेट केलंय. चीन त्यांच्या सुरक्षेला धोका पोहचवण्याच्या प्रयत्नात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण, चीननं मात्र नेहमीच याला नकार दिलाय.