नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवी अर्थात युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावरुन राजकीय आखाड्यात उडी घेण्याची शक्यता आहे. कारण युवीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला जोर आलाय.
या भेटीमुळे युवराज सिंग हरियाणातून विधानसभा निवडणूक लढविण्याची चर्चा रंगू लागली आहे. निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. 15 ऑक्टोबरला दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर युवराज सिंगने भेट घेतल्याने चर्चेत भर पडलेय.
अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे युवराज सिंग भाजपकडून विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या शक्यताना बळ आलं आहे. शाह आणि युवराज यांची हरियाणातच भेट झाली. युवी गुडगावमधूनही निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत. गुडगावमध्ये युवराजची आई राहाते. त्यामुळे तीही शक्यता आहे.
दरम्यान, युवराजने मात्र ट्विटरवरून खुलासा करताना शाह यांची भेट भारतातील कॅन्सरच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे भाजपनेही या भेटीवर अधिकृतपणे कोणतेही भाष्य अद्याप केलेले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.