रोहतक : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. कधी राजकारणाबाबत आपले बेधडक मत व्यक्त करणारा तर कधी जवानांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय.
कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा हरयाणचे काँग्रेस नेते जयभगवान शर्मा यांची मुलगी शीतल हिच्याशी विवाह झाला. यावेळी योगेश्वर दत्तने या लग्नात हुंडा म्हणून केवळ एक रुपया घेतला.
याबाबत योगेश्वर म्हणाला, मी माझ्या कुटुंबाला मुलीच्या लग्नासाठी हुंडा जमवताना येणाऱ्या अडचणी पाहिल्यात तेव्हाच मी ठरवले होते की कुस्तीमध्ये नाव मिळवेन आणि दुसरे म्हणजे हुंडा घेणार नाही. माझे पहिले स्वप्न पूर्ण झाले आणि दुसरेही करतोय.
योगेश्वर दत्तच्या विवाहसोहळ्याला अनेक व्हीआयपी मंडळी उपस्थित होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विवाहसोहळ्यास हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री खट्टर यांनी योगेश्वरच्या गावाच्या विकासकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.