मुंबई : महेंद्र सिंह धोनीने उशिरा रात्री कर्णधारपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा धोनीने का राजीनामा दिला असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे आजही पाहिलं जातं पण असं काय कारण होतं की धोनीला कर्णधारपद सोडावं लागलं.
धोनी आगामी वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार नसणार आहे. अशात आता कर्णधार कोण होणार याचा निर्णध बोर्डाला घ्यायचा आहे. विराटकडेच ही जबाबदारी जाईल. विराटने टेस्टमध्ये त्याची क्षमता सिद्ध केली आहे.
धोनीने हा निर्णय अचानक का घेतला यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरु झाल्या आहेत. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार धोनीच्या या राजीनाम्यामागे टीममध्ये सुरु असलेल्या काही गोष्टी आहेत. ज्यावर धोनीही नाराज होता. यामुळेच त्याने पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
टीम इंडियासाठी धोनीने जवळपास सगळंच काही जिंकलं. टी-20 वर्ल्डकप, 2011 मधील वनडे वर्ल्डकप, चॅम्पियनशिप ट्रॉफी या सगळ्या ट्रॉफी भारताने धोनीच्या नेतृत्वात मिळवल्या.
जर आपण धोनीनुसार विचार करु तर धोनीला असं वाटलं असेल की, टीम इंडियाला 2019 चा वर्ल्डकप विराटच्या नेतृत्वात खेळायचा आहे. तर विराटला आतापासूनच त्याची टीम तयारी करावी लागेल.
धोनीने बोर्डाला सांगितलं की, त्याने टी-20 आणि वनडे टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो खेळाडू म्हणून टीमसोबत असेल आणि आगामी इंग्लंडविरुद्धच्या सीरीजसाठी उपलब्ध आहे.