बंगळुरू : कोहलीच्या स्लेजिंगमुळे माझ्या मनातला त्याच्या बद्दलचा आदर कमी होत आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयन हिलीनं केलं होतं. हिलीच्या या टीकेला विराट कोहलीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देशामध्ये सव्वाशे कोटी नागरिक आहेत. एकाच्या वक्तव्यामुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही, असं कोहली म्हणाला आहे. माझ्याबद्दल बोलण्याआधी यूट्यूबवर जा आणि इयन हिलीनं सेंच्युरियन टेस्टमध्ये काय केलं होतं ते पाहा, असं कोहली म्हणाला आहे.
कोहलीनं सांगितलेला ही घटना १९९७ सालची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतल्या मॅचमधली आहे. ही मॅच आफ्रिकेनं ८ विकेटनं जिंकली असली तरी इयन हिलीमुळेच चर्चेत राहिली होती.
या मॅचमध्ये ब्रेट शल्ट्झच्या बॉलिंगवर कीपर डेव्ह रिचर्डसननं हिलीचा कॅच पकडला. आपण नॉट आऊट असल्याचा दावा करत इयन हिली चांगलाच भडकला आणि पॅव्हेलियनमध्ये जाताना त्यानं प्रेक्षकांना बॅट दाखवून इशारा केला आणि जिन्यावरून ड्रेसिंग रूममध्ये जाताना बॅटही फेकली. या वर्तनामुळे हिलीचं आयसीसीनं दोन मॅससाठी निलंबन केलं होतं.