नवी दिल्ली : फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जर्मनी ने अर्जेंटीनाला 1-0 ने हरवले, पण ट्विटरवर एका अकाउंटमधील ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या अकाउंटने फायनलच्या निकालाची एकदम खरी भविष्यवाणी केली होती. मॅचपूर्वी एक दिवस अगोदर 'फिफा करप्शन' नावाने अकाउंट सुरू करण्यात आले आणि ट्वीट करण्यात आला होता. यात जर्मनी 1-0 ने जिंकणार आणि गोत्जे सेकंड हाफमध्ये विनिंग गोल करेल असे भाकित वर्तविले होते.
मॅच संपल्यानंतर दिसून आले की, ‘फिफा करप्शन’ नावाने सुरू झालेल्या या ट्विटर हँडलने एक दिवसापूर्वी ट्विट केले की ते फिफामध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराला एक्सपोझ करणार आहे. यानंतर या खात्याने मॅचपूर्वी एक दिवस अगोदरच मॅचचा निकाल देऊन टाकला होता. त्यामुळे अनेकांना वाटले की फिफा भ्रष्टाचाराने पोखरला आहे. त्यामुळे अनेकांनी हा मेसेज ट्विट केला आणि रिट्विट केला. पण खरं वेगळचं होतं.
वर्ल्ड कप फायनल फिक्स करणे जवळपास अशक्य गोष्ट आहे. कोणता खेळाडू कधी गोल करणार हे ठरवणं खूप कठीण आहे. मग या ट्विटर युजरने काय केलं असेल? या ट्विटर हँडलने एक दिवस अगोदर सामन्याचा सर्व शक्यतांचा अंदाज लावला आणि त्याने सर्व ट्विट केले. जसा मॅचचा रिझल्ट लागला तेव्हा त्याने रिझल्टसंबंधी खरे अंदाज वर्तविणारे ट्विट ठेवले आणि इतर ट्विट डिलीट केले.
त्यामुळे असे वाटले की १ दिवस अगोदर त्याने सामन्याच्या रिझल्ट खराखुरा वर्तविल्याचे वाटले. त्यामुळे ट्विटरवर मॅच फिक्स होती अशी अफवा उडाली. अशा मस्करीमुळे हे ट्विटर खाते खूपच पॉप्युलर झाले. फायनलपूर्वी याचे १ हजार फॉलोवर होते आता त्याची संख्या ४३ हजार झाली आहे. मस्करीचा हा विचित्र प्रकार होता. त्यामुळे ट्विटर युजर्सला काही काळ संशयात टाकले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.