दुबई : आयसीसीनं जाहीर केलेल्या टेस्टच्या क्रमवारीमध्ये भारत आणि भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं 3-0नं जिंकली होती. या टेस्ट सीरिजमध्ये अश्विननंही धमाकेदार कामगिरी केली होती. याचा फायदा विराट कोहलीच्या टीमला आणि अश्विनला झाला आहे. आयसीसीच्या या क्रमवारीमध्ये 115 गुणांसह भारत पहिल्या तर 111 गुणांसह पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बॉलर्सच्या क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन दुसऱ्या तर इंग्लंडचा जेम्स अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विननंतर टॉप 10 मध्ये रविंद्र जडेजा हा दुसरा भारतीय सातव्या क्रमांकावर आहे.
बॅट्समनच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 906 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताकडून अजिंक्य रहाणे 825 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. अजिंक्य रहाणे वगळता एकही भारतीय बॅट्समन टॉप 10 मध्ये नाही. या क्रमवारीमध्ये चेतेश्वर पुजारा पंधराव्या तर विराट कोहली सतराव्या क्रमांकावर आहे.