मुंबई : मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर याने चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणाऱ्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने अनेक किस्से सांगितले.
सचिनने किस्सा सांगण्यास सुरूवात केली, तेव्हा तो म्हणाला, मी हा किस्सा सांगतोय पण सौरभला कळाल्यावर तो मला फटके देईल.
परदेशात दौरा होता... आम्ही एका वॉश रूममध्ये होतो. त्यात अनेक कम्पार्टमेंट होते. त्यात एकात सौरभ गेला. मग मी त्याची फिरकी घ्यायचे ठरविले. त्यावेळी सेहवागला म्हटले की सौरभची फिरकी घेऊ या...
सेहवाग सचिनला म्हणाला कशी घ्यायची फिरकी... तेव्हा सचिन त्याला म्हणाला मी सांगतो तसं कर. तू फक्त माझ्या शर्टबद्दल विचार... सेहवागने माझ्या शर्टची तारीफ करण्यास सुरूवात केली. आमच्या तिघांचा एकाच कंपनीशी करार होता.
तेव्हा सेहवाग म्हणाला, खूप छान शर्ट आहे. असा शर्ट मी पाहिला नाही. त्यावर मी म्हटलं की हा खास माझ्यासाठी तयार करण्यात आला आहे. येवढ बोलून आम्ही तेथून निघून गेलो.
हा किस्सा झाल्यावर सचिनला फोनवर फोन येऊ लागले. कंपनीचे अधिकारी म्हणत होते तुम्ही सौरभला काय सांगितले. तो आम्हांला फोन करून हैराण करीत आहे. हा किस्सा ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला....