सचिनला चित्रपट प्रमोशनसाठी वेळ पण राज्यसभेसाठी नाही

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत सचिन-या बिलियन ड्रीम्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला.

Updated: Apr 13, 2017, 08:39 PM IST
सचिनला चित्रपट प्रमोशनसाठी वेळ पण राज्यसभेसाठी नाही  title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत सचिन-या बिलियन ड्रीम्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला. खुद्द सचिनच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

एकीकडे सचिन तेंडुलकर चित्रपटाचं प्रमोशन करतोय. आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमबरोबर दिसतोय पण राज्यसभेमध्ये मात्र उपस्थित राहायला सचिनला वेळ नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये फक्त २३ वेळा सचिन संसदेमध्ये हजर होता.

मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या अधिवेशनांच्या ३४८ दिवसांपैकीची ही हजेरी आहे. २०१२ साली सचिन आणि रेखासह १२ सदस्यांची राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मागच्या पाच वर्षांमध्ये सचिवर ५८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांचं वेतन, मतदारसंघामध्ये खर्चासाठी महिन्याला ४५ हजार रुपये, १५ हजार रुपयांचा कार्यालयीन भत्ता, प्रवास आणि रोजचा भत्ताही दिला जातो.

सचिनची राज्यसभेतील ही कामगिरी पाहून समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असं अग्रवाल म्हणालेत.

२४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये सचिन हजारोवेळा मैदानात उतरला आणि जवळपास सगळीच रेकॉर्ड आपल्या नावावर केली. पण राज्यसभेचं मैदान आणि त्याचं रेकॉर्ड मात्र सचिनला फळताना दिसत नाहीये.