विशाखापट्टणम : भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं पुन्हा एकदा सौरव गांगुलीवर टीका केली आहे. गेल्या कित्येक वर्षात बंगालचं क्रिकेट बदललं आहे. आणि ते बंगालच्या एकाच प्रिन्सपुरतं मर्यादित नाही, असं शास्त्री म्हणाला आहे. विशाखापट्टणममध्ये सुरु असलेल्या भारत-इंग्लंड मॅचच्या तिसऱ्या दिवशी कॉमेंट्री करताना शास्त्रीनं दादावर तोफ डागली आहे.
रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये जून 2016 मध्ये वाद सुरु झाला. भारतीय क्रिकेटच्या प्रशिक्षकपदासाठी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर लक्ष्मण आणि संजय जगदाळे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीनं अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर रवी शास्त्री नाराज झाला होता.
प्रशिक्षकपदासाठी झालेल्या मुलाखतीवेळी सौरव गांगुली उपस्थित नव्हता, गांगुलीचं हे वागणं अपमानकारक असल्याचं शास्त्री म्हणाला होता. गांगुलीनंही शास्त्रीच्या या टीकेला उत्तर दिलं होतं. माझ्यामुळे रवी शास्त्रीची प्रशिक्षकपदासाठी निवड झाली नाही असं वाटत असेल तर तो वेड्यांच्या जगात जगतोय, असं गांगुली म्हणाला होता.