सिडनी : तिरंगी मालिकेतील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यास उशीर झाला कारण आधीच पावसाची रिपरिप सुरू होती, यानंतरही मध्ये पावसाचा व्यत्य आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
आता भारताला अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बोनस गुणासह विजय मिळविणे गरजेचे आहे.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे सामना 44 षटकांचाच करण्यात आला होता. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवनला अपय़श आले.
तो अवघ्या आठ धावांवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अंबाती रायडू आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, रायडू फटकेबाजीच्या प्रयत्नात झेल देऊन बाद झाला. त्याचा वॉर्नरने उलट्या दिशेने धावत जाऊन सुरेख झेल घेतला.
अखेर रहाणे आणि कोहली मैदानात असताना पुन्हा पावसास सुरवात झाली. शेवटी पंचांनी सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. भारताने १६ षटकांत २ बाद ६९ धावा केल्या होत्या.
तिरंगी एकदिवसीय मालिकेत अजूनही भारताला विजयाला गवसणी घालता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताने या सामन्यासाठी संघात रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा यांना स्थान दिले होते. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना वगळण्यात आले आहे. तर, ऑस्ट्रेलियाने पूर्ण क्षमतेने संघ उतरविला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.