मिथील आजगावकर ठरला रॉयल फ्रीडम कपचा मानकरी

 शेवटच्या फेरीपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱया रॉयल ऍग्रो फुड्स पुरस्कृत रॉयल फ्रीडम कप जलद बुद्धिबळ स्पर्धेत मिथील आजगावकरने बाजी मारली. 

Updated: Aug 17, 2016, 10:03 PM IST
 मिथील आजगावकर ठरला रॉयल फ्रीडम कपचा मानकरी title=

मुंबई :  शेवटच्या फेरीपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱया रॉयल ऍग्रो फुड्स पुरस्कृत रॉयल फ्रीडम कप जलद बुद्धिबळ स्पर्धेत मिथील आजगावकरने बाजी मारली. 

अस्तित्व संस्कार प्रबोधिनी आणि साईशा प्रतिष्ठानने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या भव्य स्पर्धेच्या शेवटच्या डावात विजेतेपदाच्या शर्यतीत चक्क पाच खेळाडू होते आणि त्यापैकी चौघांनी नवव्या फेरीनंतर समान 7.5 गुण कमावले होते. 

अखेर सरस बुकल्स गुणांच्या आधारे मिथील आजगावकरच्या गळ्यात जेतेपदाची माळ पडली.

ना.म.जोशी मार्गावरील ना.म.जोशी मार्ग महापालिका शाळा संकुलात अस्तित्व संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून आणखी एका नीटनेटक्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सुमारे 180 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मुंबई व आसपासच्या अनेक मानांकित खेळाडूंनी आपले वेगवान बुद्धिकौशल्य सादर केले. या स्पर्धेत इतकी चुरस पाहायला मिळाली की पाच डावापर्यंतच मिथील आजगावकर, केतन बोरिचा आणि राहुल पवार हे तिघे सलग विजय नोंदवू शकले. त्यानंतर कुणीही आपल्या विजयात सातत्य राखू शकला नाही.

 मिथीलला पुढील चार पैकी तीन डाव बरोबरीत सोडवण्यातच धन्यता मानावी लागली. तोच एकमेव असा खेळाडू ठरला की त्याला कुणी हरवू शकला नाही तर स्वप्निल कोठारी आणि केतन बोरिचा यांना पाचव्या डावात पराभव पत्करावा लागला तरी ते शेवटपर्यंत जेतेपदाच्या नजीक होते.
 

स्पर्धेची शेवटची फेरी जबरदस्त झाली. केवळ 15 मिनीटांचा खेळ असला तरी प्रत्येक चालीला पाच सेंकदाची वाढ होणाऱया या वेगवान स्पर्धेचा अंतिम डाव तासभर रंगला. केतन बोरिचाने या डावात वेळ संपायला 10 सेकंद असताना राहुल पवारला मात देऊन 7.5 गुण मिळवले, पण केतनच्या हातून जेतेपद निसटले होते. शेवटच्या डावात मिथील हरला असला तरी जेतेपदावर कोठारीच्या नावाची मोहोर उमटणार हे निश्चित होते. पण तसेही झाले नाही. क्षणाक्षणाला एकमेकांना शह-काटशह देत रंगलेल्या लढाईत दोघांनी बरोबरी साधली. 

कोठारीला जेतेपदासाठी केवळ विजयच हवा होता तर मिथीलला बरोबरीही पुरेशी होती. डाव कोठारीच्या हातात होता, पण त्याला शेवटच्या काही सेंकदात निर्णायक विजय मिळविता आला नाही आणि बरोबरीत सुटलेला मिथील सरस गुणांवर विजेता ठरला. या भव्य-दिव्य स्पर्धेचा पुरस्कार सोहळा रॉयल ऍग्रो फुड्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा काशीनाथ जाधव, मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सरचिटणीस पुरूषोत्तम भिलारे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा मेणसे आणि ऍडव्होकेट बुद्धिबळपटू स्वप्निल कोठारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

या खुल्या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनीही मोठा सहभाग नोंदवला होता. यात हिरक सावंत, आर्यन गुप्ता, ग्रीष्मा धुमाळ आणि  आयुष शेठ यांनी 5.5 गुणांसह गटविजेतेपद पटकावले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरेंदर सरदार तर महिलांमध्ये शुभांगी साळुंखे अव्वल आल्या. या स्पर्धेत 20 अव्वल खेळाडूंसह 20 शाळकरी विद्यार्थ्यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 
रॉयल फ्रीडम कप बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल

खुला गट - 1. मिथील आजगावकर (7.5), 2. केतन बोरिचा (7.5), 3. स्वप्निल कोठारी (7.5), 4. केतन पाटील (7.5), 5. नितीन कांबळे (7), 6. राहुल पवार (6.5), 7. निखील कदम (6.5), 8. अनिल संदांशी ( 6.5), 9. अमिन शेख (6.5), 10. अभिषेक गिरी (6.5), 11. सन्मान हडकर (6.5), 12. विशाल धारिया (6.5), 13. राजाबाबू गजेनगी (6), 14. मंदार साने (6), 15. प्रियदर्शनी तोरणे (6).
सर्वोत्तम ज्येष्ठ खेळाडू -  सुरेंदर सरदार, सर्वोत्तम महिला खेळाडू - शुभांगी साळुंखे.

14 वर्षाखालील मुलांचा गट

8 वर्षाखालील मुले - 1. ओम कदम (5 गुण), 2. ध्रुव हळदणकर (4), 3. प्रथमेश गावडे (4); मुली - 1. समीक्षा जाधव (4) 2. सायली तांबे (4)
10 वर्षाखालील मुले - 1. हिरक सावंत (5.5),2. अथर्व गवस (4),3. विराज गोगटे (4);  मुली - 1. सिद्धी रहाटे (4), 2. हिमानी वेतूरकर (2)
12 वर्षाखालील मुले - 1. आर्यन गुप्ता (5.5), 2. तन्मय मगादे (5), 3. आर्यन शाह (4) ; मुली - 1. संस्कृता बल्लेवार (4.5), 2. खुशी चौडकी (4).
14 वर्षाखालील मुले - 1. आयुष शेठ (5.5), 2. व्ही. आर. सुमुख (5.5), 3. यश देसाई (5) ; मुली - 1. ग्रीष्मा धुमाळ (5.5), 2. झील यादव (2).