एमसीए निवडणूक : शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष

'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या चुरशीच्या निवडणुकीत पवार-महाडदळकर गटानं विजय मिळवलाय.

Updated: Jun 17, 2015, 10:06 PM IST
एमसीए निवडणूक : शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष title=

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा एकदा शरद पवार आणि बाळ महाडदळकर गटाचा झेंडा फडकला... एमसीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची सातव्यांदा निवड झालीय.

शरद पवार यांना १७२ मतं मिळाली. तर शिवसेनाप्रणित क्रिकेट फर्स्टचे पराभूत उमेदवार विजय पाटील यांना १४५ मतं मिळाली.

उपाध्यक्षपदी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा विजय झाला. 

शिवसेनेची मात्र या निवडणुकीत अक्षरशः दांडी गूल झाली. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रताप सरनाईक हे दोघेही पराभूत झाले. 

रवी सावंत यांचा अपवाद वगळता पवार-महाडदळकर गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. संयुक्त चिटणीसपदी क्रिकेट फर्स्टचे उन्मेष खानविलकर यांनी रवी सावंत यांना आपटी दिली. 

दरम्यान, शरद पवार गटाच्या विजयानंतर एमसीए कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


प्रतिष्ठा पणाला

असं पार पडलं मतदान... 

'मुंबई क्रिकेट असोशिएशन'च्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान आज पार पडलं. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रिकेत एकूण ३२१ मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण ३२९ जणांना एमसीएच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. 

मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांमध्ये नारायण राणेंचाही समावेश आहे. चार जणांना तांत्रिक कारणांमुळे मतदान करता आलं. तर दोन जणांनी आजारी असल्याचं कारण देऊन मतदान केलेलं नाही. 

गेल्या चौदा वर्षांपैकी बारा वर्ष शरद पवारांनी एमसीएचं अध्यक्षपद भूषवलं आहे. तर विजय पाटील गेली चार वर्ष एमसीएचे उपाध्यक्ष आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पवार-महाडदळकर गट विरुद्ध विजय पाटील यांचं क्रिकेट फर्स्ट पॅनेल अशी लढत रंगली.

मुंबईतल्या विविध क्लब, संस्था, कॉलेजांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतात. यंदा शरद पवार विरूद्ध विजय पाटील अशी अध्यक्षपदासाठी लढाई असली तरी खरा सामना रंगला तो पवार विरूद्ध उद्धव ठाकरे असा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.