बंगळुरु: दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यावर पावसानं पाणी फेरलं असून हा सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाना एक - एक गूण देण्यात आले असून या एका गुणासह बंगळुरुनं प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे.
आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ आमनेसामने असून बंगळुरुनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. या पर्वात सूर न सापडलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यात आक्रमकपणा दाखवत बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई केली. डीकॉक आणि श्रेयस अय्यरनं ६ ओव्हरमध्ये ५० रन्स चोपून संघाला अर्धशतकी सलामी दिली.
अय्यर २० रन्सवर आऊट झाला. यानंतर डीकॉक आणि कॅप्टन ड्यूमिनीनं बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. डिकॉक ३९ बॉल्सवर ६९ रन्स करुन माघारी परतला. युवराज सिंग आणि केदार जाधव स्वस्तात बाद झाले. पण ड्यूमिनीनं एकाकी झुंज देत ४३ बॉल्समध्ये ६७ रन्सची खेळी केली.
बंगळुरुतर्फे हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या मॅचमध्ये विजय मिळवून आयपीएलमधील यंदाच्या पर्वातील शेवट गोड करण्याचा दिल्लीचा इरादा होता. पण दिल्लीच्या या इराद्यावर पावसानं पाणी फेरलं.
बंगळुरुनं १.१ षटकांत बिनबाद दोन धावा केल्या. यानंतर पावसानं दमदार हजेरी लावल्यानं मॅच थांबविली. पंचांनी दोनदा खेळपट्टीची पाहणी केली. मात्र शेवटी हा सामना रद्द करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.