कोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय

मोहाली वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा सात विकेटनं दणदणीत पराभव केला आहे.

Updated: Oct 23, 2016, 10:27 PM IST
कोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय title=

मोहाली : मोहाली वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा सात विकेटनं दणदणीत पराभव केला आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला विराट कोहली. कोहलीनं 134 बॉलमध्ये नाबाद 154 रनची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. कोहलीच्या या खेळीमध्ये 16 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. वनडे क्रिकेटमधली कोहलीची ही 26वी सेंच्युरी आहे.  

286 रनचा पाठलाग करताना भारताला सुरवातीला दोन धक्के बसले. पण त्यानंतर  कोहली आणि धोनीनं भारताला सावरलं आणि विजय सोपा करून दिला. धोनीनं 91 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली. धोनीनं या इनिंगमध्ये 6 फोर आणि तीन सिक्स मारल्या.

मोहाली वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.  न्यूझीलंडचा संघ 49.4 ओव्हरमध्ये 285 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडच्या टॉम लेथमनं 61 तर नीशमनं 57 रन केल्या. तळाला आलेल्या मॅट हेन्रीनंही 39 रन करून न्यूझीलंडला सन्मानपूर्वक स्कोअरपर्यंत पोहोचवलं. पाच मॅचच्या या सीरिजमध्ये आता भारत 2-1नं आघाडीवर आहे.  

ही मॅच धोनीसाठी खास महत्त्वाची होती. धोनीनं या मॅचमध्ये तीन रेकॉर्ड केले. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा धोनी पहिलाच विकेट कीपर बनला आहे. याच मॅचमध्ये धोनीनं नऊ हजार रनचा टप्पा ओलांडला तर धोनी आता वनडेमध्ये सर्वात जास्त सिक्स मारणारा भारतीय बनला आहे. सचिनच्या 195 सिक्सचा विक्रम धोनीनं मोडीत काढला आहे.