ऑकलंड : अनेक वर्षांपासून चोकर्सचा ठपका लागलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स याने हा वर्ल्ड कप आमचा असल्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंड विरूद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलच्या पूर्वसंध्येला डिव्हिलिअर्स पूर्ण आश्वस्त आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी कधीही वर्ल्ड कपची फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही.
डिव्हिलअर्सने म्हटले की, आम्हांला आत्मविश्वास आहे. मला वाटते की टीम खूप चांगली वाटचाल करीत आहे. आत्मविश्वास दुणावण्याचे अनेक कारणं असल्याचेही त्याने नमूद केले.
आम्ही जर पूर्ण क्षमतेने झोकून दिले तर टुर्नामेंटमध्ये आम्हांला कोणीही रोखू शकत नाही. न्यूझीलंडमध्ये यापूर्वी झालेल्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेने २-०ने विजय मिळविला होता. पण वर्ल्ड कपच्या पहिल्या सराव सामन्यात मात्र न्यूझीलंडने बाजी मारली होती.
यापूर्वी वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील ४ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. तर दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. दोन्ही संघात वर्ल्ड कपमध्ये झालेले मागील तीन सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.
डिव्हिलिअर्सचा इतिहासात रस नाही. माझ्यामते आमचा संघ २०१५मध्ये कशी कामगिरी करतो यावर माझे अधिक लक्ष आहे. भूतकाळ आणि वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीला प्रमाणापेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे. आम्ही चांगले क्रिकेट खेळले तर आम्ही जिंकू शकतो. एक टीम म्हणून आम्हांला आमच्या क्षमतांवर विश्वास आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.