पेशावर : पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स या दोन संघातील संघातील सामना वहाब रियाझ आणि अहमद शहजाद यांच्या वादाने चांगलाच चर्चेत राहिला. मात्र या सामन्यात नवा विक्रमही रचला गेला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम यापूर्वी कधीच केला गेला नव्हता.
या सामन्यात क्वेट्टा ग्लॅडिएटर्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंजीचा निर्णय घेतला. सुरुवात चांगली झाल्यानंतरही मधल्या फळीतीली फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे क्वेट्टाने अवघ्या ६६ धावांत ९ गडी गमावले. त्यामुळे क्वेट्टाचा डाव लवकर संपेल असे वाटत होते. मात्र नववा गडी बाद झाल्यानंतर जुल्फीकर बाबरने मैदानावर तग धरताना इलियटसह ४४ चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात १० व्या विकेटसाठी झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी होती. याआधी टी-२०मध्ये २००५मध्ये हीथ स्ट्रीक आणि एनयनने बर्मिंगहॅममध्ये १०व्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली होती.