नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याला स्थान देण्यात आलेय. ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नीच्या जागी पंड्याचा समावेश करण्यात आलाय.
पंड्याने यावर्षी जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली होती.
तसेच गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजमध्येही तो खेळला होता. आता कसोटी सामन्यांतही तो पदार्पण करतोय. पांड्याने केवळ 10 महिन्यांच्या अवधीत त्याने क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळवलेय.
22 वर्षीय पंड्याचा टीम इंडियामधील प्रवास चांगलाच खडतर होता. एका मीडिया हाऊसला दिलेल्ये मुलाखतीत त्याने या प्रवासाबद्दल सांगितले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये केवळ पाच रुपयांची मॅगी खाण्याइतपतही त्याच्याकडे पैसे नव्हते.
जेव्हा रणजीमध्ये त्याने बडोदा संघाकडून खेळण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या वडिलांना तिसरा हार्ट अॅटॅक आला होता. तसेच त्याच्या वडिलांचा व्यवसायही तोट्यात होता. हार्दिकला त्याच्या भावाने खूप मदत केलीये.