काँग्रेसच्या गौरव पांधींवर सेहवाग भडकला

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Updated: Feb 16, 2017, 06:49 PM IST
काँग्रेसच्या गौरव पांधींवर सेहवाग भडकला  title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी मात्र सेहवाग काँग्रेसचं डिजीटल कम्यूनिकेशन पाहणारे गौरव पांधींवर चांगलाच भडकला आहे. अंधांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सेहवागनं भारतीय संघाला शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं.

या ट्विटमध्ये सेहवागनं #OtherMenInBlue हा हॅशटॅग वापरला होता. अंध संघाचा उल्लेख OtherMenInBlue असा केल्यामुळे भारताचा कॅप्टन अजय रेड्डी नाराज झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. अजय रेड्डीचं म्हणणं बरोबर असल्याची प्रतिक्रिया पांधींनी दिली होती. तसंच कोहलीच्या टीमला OtherMenInBlue असं बोललं जाईल का असा सवाल पांधींनी विचारला होता.

पांधींच्या या ट्विटमुळे सेहवाग नाराज झाला आणि त्यानं पांधींना ट्विटरवरच सुनावलं. पांधींनी अभ्यास करून असं वक्तव्य केलं असतं तर बरं झालं असतं. पण अभ्यास आणि मीडिया हातात हात घालून कधीच चालत नाहीत.  #TheOtherMeninBlue हेच वर्ल्ड कपसाठीचं भारताचं अधिकृत कॅम्पेन असल्याचं सेहवाग म्हणाला आहे. 

दरम्यान अजय रेड्डीनं मात्र आपण नाराज असल्याच्या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. याबाबत स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ अजय रेड्डीनं शेअर केला आहे.