क्रिकेटपटू-बॉलीवूड अभिनेत्रींच्या पार्टनरशीप

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानचा चक दे गर्ल सागरिका घाटगेबरोबर साखपुडा झाला आहे. 

Updated: Apr 25, 2017, 06:31 PM IST
क्रिकेटपटू-बॉलीवूड अभिनेत्रींच्या पार्टनरशीप title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानचा चक दे गर्ल सागरिका घाटगेबरोबर साखपुडा झाला आहे.

झहीर खाननं इन्स्टाग्रामवर साखरपुडा झाल्याच्या औपचारिक घोषणेचा फोटो शेअर केला आहे.

बायकोच्या पसंतीवर कधीच हसू नका. तुम्हीपण तिचीच पसंती आहात. सगळ्या आयुष्याची जीवनसाथी, एनगेज्ड सागरिका घाटगे, असं झहीर हा फोटो शेअर करताना म्हणाला आहे. बॉलीवूड आणि क्रिकेटपटूंमधली ही काही पहिलीच पार्टनरशीप नाही.

याआधीही बॉलीवूड अभिनेत्रींना क्रिकेटचं मैदान भावलं. यातल्या काही पार्टनरशीप हिट ठरल्या तर काही फ्लॉप. या काही जोड्यांवर एक नजर टाकूयात. 

मन्सूर अली खान पतौडी- शर्मिला टागोर

क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीची लग्नाची ही पहिलीच वेळ होती. २७ डिसेंबर १९६९ला मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर विवाह बंधनात अडकले. पतौडी आणि शर्मिला टागोर यांना सैफअली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान अशी तीन मुलं आहेत.

रीना रॉय- मोहसिन खान

८०च्या दशकामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खान आणि बॉलीवूड अभिनेत्री रीना रॉय यांनी लग्न केलं. १ एप्रिल १९८३ ला या दोघांनी आयुष्याची नवी इनिंग सुरु केली. लग्नानंतर हा जोडा आधी कराचीमध्ये आणि मग मुंबईमध्ये राहिला. मोहसीननं मुंबईमध्ये चित्रपटामध्ये करिअर बनवण्याचा प्रयत्न केला. मोहसिन आणि रिनाला एक मुलगीही झाली. पण काही कारणांमुळे मोहसिन आणि रीनानी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.

विव्हियन रिचर्ड्स- नीना गुप्ता

विव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. विव्हियन रिचर्ड्सचं आधी लग्न झालेलं असतानाही तो नीना गुप्ताबरोबर रिलेशनशीपमध्ये होता. या दोघांना मसाबा नावाची एक मुलगीही आहे.

अझरुद्दीन- संगिता बिजलानी

पहिलं लग्न झालेलं असतानाच अझरुद्दीन आणि संगिता बिजलानी यांच्यामध्ये अफेअर असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. एका जाहिरातीच्या शूटिंगवेळी या दोघांची भेट झाली होती. १९९६मध्ये अझरनं त्याच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर संगिताबरोबर लग्न केलं पण काही वर्षांपूर्वी या दोघांचा घटस्फोट झाला.

हरभजन सिंग- गीता बसरा

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरानं २९ ऑक्टोबर २०१५ ला लग्न केलं. हरभजन आणि गीताला नऊ महिन्यांची मुलगी आहे.

शॉन टेट- माशूम सिंघा

आयपीएल २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर शॉन टेटची भेट भारतीय मॉडेल माशूम सिंघाबरोबर झाली. यानंतर १२ जून २०१४मध्ये या दोघांनी लग्न केलं.