कोलंबो : राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये स्थान हवं असेल किंवा मिळविलेलं स्थान टिकवायचं असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांशी शारीरिक संबंध स्थापित करावे लागतात, अशा प्रकारची खळबळजनक कबुली श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटूंनी दिल्यानं देशात खळबळ माजली आहे. चित्रपटांप्रमाणे आता क्रिकेटमधील ‘कास्टिंग काऊच’चा हा प्रकार चव्हाटय़ावर आला.
राष्ट्रीय संघात स्थान हवं असेल, तर आमच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करा, अशी मागणी हे निवडकर्ते करीत असल्याची महिला क्रिकेटपटूंनी तक्रार केली. श्रीलंकेच्या मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांविरुद्ध आरोप केले आहेत.
राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी किंवा असलेलं स्थान टिकविण्यासाठी अधिकाऱ्यांपासून निवडकर्त्यांपर्यंत शरीरिक संबंध ठेवावे लागतात. सर्वांना खूष केल्याशिवाय निवडीचा विचारही होत नाही, असं खेळाडूंनी सांगितलं.
दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मात्र टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांवर लागलेल्या या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे तडकाफडकी आदेश दिले. लंकेच्या पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ते सनथ जयसूर्या, एसएलसी सचिव निशांत रणतुंगा आणि सहसचिव हेरांता परेरा यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली.
रिपोर्टनुसार चार सदस्यांचं चौकशी पथक प्रकरण हाताळेल. तथ्य पुढे आणण्यासाठी श्रीलंकेच्या महिला खेळाडू आणि टीम मॅनेजमेंट चर्चा करतील. महिलासंघाचे व्यवस्थापक आणि निवडकर्ते यांना शुक्रवारच्या बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.