ऑकलंड : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने केवळ १४ बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरलेय.
ऑकलंडमधील मैदानावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ८ विकेटच्या बदल्यात १४२ रन्स केल्या होत्या. यामध्ये अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद ८२ रन्सचा वाटा होता. श्रीलंकेचे हे आव्हान न्यूझीलंडने एक गड्याच्या मोबदल्यात केवळ १० ओव्हरमध्येच पूर्ण केले. या विजयामुळे न्यूझीलंडने दोन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली.
सलामीवीर मार्टिन गुप्टीलने आपली लय कायम ठेवताना अर्धशतक झळकावित २५ बॉलमध्ये ६३ रन्स केल्या. यात पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर मुन्रोने पहिल्या बॉसपासून आक्रमक सुरुवात केली. त्याने अवघ्या १४ बॉलमध्ये सात षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने नाबाद अर्धशतक पूर्ण केले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक युवराजसिंगने झळकाविलेले आहे. त्याने १२ चेंडूत अर्धशतक केले.