मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत असणाऱ्या सचिन तेंडुलर, सौरव गांगुली, वी वी एस लक्ष्मण यांनी द्रविडच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे.
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. त्यांच्या नंतर ही जागा कोण घेणार असा प्रश्न सध्या आहे. तरुण खेळाडूंना खासकरुन टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी फलंदाजांना प्रशिक्षण देऊ शकेल अशा व्यक्तीच्या शोधात सध्या बीसीसीआय आहे. पण, द्रविडने मात्र या आमंत्रणावर कोणताही निर्णय अद्याप तरी दिलेला नाही.
राहुल द्रविड सध्या अंडर १९ संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्यावरील जबाबदारी वाढवून आता त्याला संघाचा प्रशिक्षक करण्याची बीसीसीआयची इच्छा आहे. द्रविडने जर ही जबाबदारी स्वीकारली तर त्याला २०१९ सालच्या विश्वचषकापर्यंत ही जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
द्रवि़डने त्याच्या कारकीर्दीत १६४ टेस्ट सामने तर २४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. द्रविडने ही जबाबदारी स्वीकारल्यास भारताची टेस्ट क्रिकेटमधील 'वॉल' तो भक्कम करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.