www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संजय दत्तच्या शरणागतीचं काऊंटडाऊन सुरू झालंय. टाडा न्यायालयात आज तो आत्मसमर्पण करणार आहे. संजय कोणत्या कारागृहात जाणार याचाही फैसला आज टाडा कोर्ट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येरवडा जेलमध्ये संजय दत्तला हलवण्याची तयारी सुरू आहे. संजयला तुरुंगातील बिल्लाही मिळालाय.
संजय दत्त आज टाडा कोर्टात शरणागती पत्करणार आहे. सुप्रीम कोर्टानं सरेंडर होण्यासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत आज संपतेय. त्यामुळे त्याला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत कोर्टात शरण यावंच लागेल. तुरूंगात जाण्यापूर्वी संजय दत्तची शेवटची मुक्त रात्र असल्यामुळे काल रात्री बॉलिवूडमधले त्याचे सहकारी, मित्र यांची त्याला भेट द्यायला बरीच गर्दी होती. अभिनेता सलमान खानही संजयच्या भेटीला आला होता. त्याच्या घराबाहेर मीडिया, पोलीस आणि त्याच्या चाहत्यांनी गर्दी केलीये.
‘कैदी क्रमांक – सी १५१७०’
संजय दत्तला नेमकं कोणत्या जेलमध्ये हलवण्यात येईल हे अजून निश्चित नसलं तरी येरवड्यात मात्र त्याला ओळख मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. संजय दत्तला कैदी क्रमांक देण्यात आलाय. ‘कैदी क्रमांक – सी १५१७०’ अशी त्याची ओळख असणार आहे. जेलमध्ये तो याच क्रमांकाने ओळखला जाणार आहे. येरवडा जेलच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय.
संजयला रोज मिळणार २५ रुपये
तुरुंगवारी सुरू झाल्यानंतर संजूबाबाची रोजची कमाई फक्त २५ रुपये असेल आणि या रोजंदारीसाठी त्याला तुरुंगातील सह-कैद्यांसाठी जेवण बनवावं लागणार आहे. सर्वसाधारणपणे, तुरुंगात कैद्यांना कार्पेट, चामड्याच्या वस्तू बनवण्याचं किंवा कारपेंटरचं काम दिलं जातं. यापैकी आपल्या आवडीचं काम कैदी निवडू शकतात. त्यानुसार, गेल्या वेळी १८ महिने तुरुंगात असताना संजय दत्तनं कारपेंटरचं काम केलं होतं. परंतु, यावेळी त्याची रवानगी जेलमधील स्वयंपाकघरात करण्यात येणार असल्याचं समजतं. कैद्यांसाठी जेवण बनवण्याच्या कामात संजूबाबा मदत करेल आणि त्याचा मेहेनताना म्हणून त्याला दररोज २५ रुपये दिले जातील, अशी माहिती मिळतेय. संजय दत्तचा हळूहळू या कामात हात बसल्यानंतर त्याची पगारवाढही होईल. त्यानंतर त्याला रोज ५० रुपये मिळतील. या उत्पन्नाशिवाय, संजूबाबाला त्याचे कुटुंबीय दरमहा १५०० रुपये देऊ शकतात.
कुटुंबीयांची भेट
एक महिन्यात आपल्या पाच कुटुंबीयांना २०-२० मिनिटं भेटण्याची मुभा संजय दत्तला मिळणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.