www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम नोंदवणा-या सचिन तेंडुलकरच्या नावावर मैदानाबाहेरही एका अनोख्या विक्रमाची नोंद झालीय. भारतातल्या सर्व प्रकारच्या खेळांच्या खेळाडूंपैकी सर्वाधिक पुस्तकं ही सचिन तेंडुलकरवर लिहिली गेलीत. भारतातील अनेक भाषांमध्ये सचिनवरची पुस्तके प्रकाशित झालीत. शिवाय पाश्चिमात्य लेखकांवरही सचिननंच गारूड केलंय.
वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर मराठी साहित्यिक असले तरी सचिननं लेखणीच्या फटक्यांऐवजी बॅटचे फटके मारुन क्रिकेट साम्राज्यावर अधिराज्य गाजवलं. परंतु नकळत का होईना, वडिलांच्या साहित्यक्षेत्रात सचिनच्या खात्यावर एक विक्रम नोंदवला गेलाय. भारतातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या सचिनवर सर्वाधिक पुस्तकेही लिहली गेली आहेत. भारतात विविध भाषांमध्ये सचिनवरची पुस्तके प्रकाशित झालीत. शिवाय विदेशी लेखकांनाही सचिनच्या यशस्वी कारकिर्दीनं भुरळ घातलीय. परदेशी क्रीडा पत्रकारांनीही कित्येक पुस्तके सचिनवर लिहली आहेत.
भारतातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक म्हणजे पन्नासहून अधिक पुस्तकं सचिनवर लिहली गेली आहेत. यामध्ये जादा तर क्रीडा पत्रकारांनी सचिनच्या कारकीर्दीचा आढावा घेतलाय. सचिनचा भाऊ अजित तेंडुलकरलाही सचिनवर लिहण्याचा मोह आवरलेला नाही. त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीवर `असा घडला सचिन` हे पुस्तक त्यांनी लिहले आहे.
देशात आणि देशाबाहेरही सचिनचे कोट्यवधी चाहते आहेत. ज्यांना सचिनच्या खेळाबरोबरच त्याच्याविषयी इतर गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागलेली असते. ती भूक ही पुस्तकं भागवताना दिसतायत. सचिनच्या नावावर सर्व काही खपतं हा मार्केटचा मंत्रही पुस्तकं लिहणा-यांना फायदेशीर ठरतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.