सचिन म्हणतो, `आई तुझ्याचसाठी...`

१४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर आपल्या टेस्ट क्रिकेटमधील शेवटची मॅच खेळणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 15, 2013, 04:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर आपल्या टेस्ट क्रिकेटमधील शेवटची मॅच खेळणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे. मात्र, सचिननं आपल्या शेवटच्या मॅचची साक्षीदार होणाऱ्या आपल्या आईसाठीच मुंबईत टेस्ट खेळवण्याचा आग्रह धरला होता.
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... आता या देवाची बॅटिंग क्रिकेटप्रेमींना पाहता येणार नाही. सचिन निवृत्त होत असल्यानं त्याच्या बॅटिंगच्या ट्रीटला जगभरातील क्रिकेटप्रेमींना मुकावं लागणार आहे. आपल्या क्रिकेटमधील शेवटची मॅच सचिन वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. ही मॅच मुंबईतच व्हावी यासाठी सचिननं आग्रह धरला होता. आणि याचं कारणही तसंच होतं. सचिन तेंडुलकरची आई रजनी तेंडुलकर यांनी आपल्या मुलाची एकही मॅच स्टेडियमवर जाऊन पाहिलेली नाही. करिअरमधील शेवटची मॅच हा सचिनच्या कुटुंबीयांसाठी अतिशय भावूक क्षण असणार आहे. आपल्या आईनं करिअरमधील आपली अखेरची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थिती रहावं, अशी सचिनची इच्छा होती. त्यामुळेच त्यानं बीसीसीआयकडे याची शिफारस केली होती. बीसीसीआयनं ती मान्यही केली. त्यामुळेच आता सचिनच्या अखेरच्या मॅचमध्ये त्याची आई सचिनचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमध्ये उपस्थित असणार आहे.
मितभाषी म्हणून सचिन क्रिकेटविश्वात ओळखला जातो. त्याला घडवण्याचं काम केलं ते रजनी तेंडुलकर यांनीच. लहानपणापासूनच रजनी तेंडुलकर यांनी त्याच्यावर केलेल्या संस्कारामुळेच आज सचिन क्रिकेटच्या अतिउच्च शिखरावर पोहचूनही त्याचे पाय मात्र जमिनीवर आहेत. लहानपणी सचिन मस्तीखोर होता आणि वडिलांच्या रागापासून वाचवण्यासाठी त्याची आई नेहमीच ढाल बननू उभी असायची. आता सचिनची आई आजारी आहे. त्यामुळेच सचिननं मुंबईत मॅच घेण्याची विनंती केली होती.

सचिनच्या या विनंतीला मान देत अखेरची मॅच वानखेडेवरच होणार आहे. त्यामुळे सचिन जेव्हा आपली अखेरची मॅच खेळायला मैदानात उतरेल, त्यावेळी त्याची आईही त्याच्याबरोबर स्टेडियममध्ये उपस्थिती असेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.