www.24taas.com, नवी दिल्ली
रिअल्टी कंपनी डीएलएफसोबत आपल्या व्यावसायिक संबधांबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. फुकटातल्या प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या लोकांनी आपल्यावर हे बिनबुडाचे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय.
आपण गेल्या २२ वर्षांपासून व्यावसायिक क्षेत्रात आहोत आणि व्यापाराशी संबंधित सगळे व्यवहार आपण पारदर्शी पद्धतीनं केले आहेत आणि आपण कायद्यांना मानणाऱ्या व्यक्तींपैकी एक असल्याचं वढेरा यांनी म्हटलंय. असे बिनबुडाचे आरोप करून आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं वढेरा म्हणतात. ‘स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी माझ्यावर असे आरोप केले जात आहेत’ असा आरोप वढेरा यांनी केलाय.
प्रियंका गांधी यांचे पती आणि सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे सणसणीत आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य अरविंद केजरीवाद यांनी केला आहे. त्यावर वढेरा यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. डीएलएफ या कंपनीनंही कोणत्याही प्रकारची संपत्ती वढेरा यांना विकल्याच्या आरोपांना नकार दिलाय.