www.24taas.com, झी मीडिया, पुणे
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. डॉ.दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातोय...
२० ऑगस्ट रोजी काळी ६.३० च्या सुमारास डॉ.नरेंद्र दाभोलकर नेहमीप्रमाणे पुण्यातल्या आपल्य़ा अमेय अपार्टमेंटमधून सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. शनिवार पेठेतील पोलीस चौकीकडून ते बालगंधर्वच्या दिशेनं जाणा-या ओंकारेश्वर पुलाकडं वळले..
त्याचवेळी मोटर सायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोर त्यांचा पाठलाग सुरु केला..मात्र दाभोलकरांना त्याची खबर नव्हती. हल्लेखोरांनी आपली मोटर सायकल पोलीस चौकी समोर उभी केली आणि पायी चाललेल्या डॉ.दाभोळकरांना हल्लेखोरांनी गाठले. ओंकारेश्वर पुलावर हल्लेखोरांनी अगदी जवळून डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर पाच राऊंड फायर केले..तीन गोळ्या डॉ.दाभोलकरांना लागल्या..एक गोळी त्यांच्या डोक्यात तर दोन छातीत लागल्या. त्यानंतर हल्लेखोर शांतपणे आपल्या मोटरसायकलकडे आले आणि ते आपल्या मोटरसायकलवरुन रामबाग शाळेच्या दिशेने निघून गेले..
ही घटना घडली त्या ठिकाणाहून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मात्र हल्लेखोर वेगळ्या रस्त्याने पसार झाले. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. लोक रस्त्यावर उतरले. हल्लेखोरांची माहिती देणा-याला मुख्यमंत्र्यांनी दहा लाखाचे बक्षिस देण्याची घोषणा केली. डॉ. दाभोलकरांवरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. या घटनेला आज तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. पुणे पोलिसांची गुन्हेशाखा तसेच मुंबई पोलीसांची गुन्हेशाखेचे दोन पथकं हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र ७२ तास उलटून गेले तरी पोलीस अंधारात चाचपडत असल्याचं चित्र आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या एका समाज सुधारकाची दिवसाढवळ्या हत्या केल्यानंतर त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट कसे? एरव्ही पोलिसांची पाठराखण करणारे राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील गप्प का? असा सवाल आता केला जातोय. डॉ. दाभोळकरांचे मारेकरी कधी जेरबंद होणार? असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला असून त्याचं उत्तर मात्र पोलीसांकड नाही ही वस्तूस्थिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.