www.24taas.com, झी मीडिया, पुणे
तोतया पोलिसांकडून फसवणूक झाल्याचा प्रकार अनेकदा आपल्या कानावर पडत असतो. मात्र, खरेखुरे पोलिसच असे प्रकार करतील असेल तर? ही काल्पनिक स्थिती नाही तर सत्य घटना आहे.
पुण्यात सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून एका व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्यात आलाय. कयानी बेकरीच्या मालकाला २१ लाखांचा गंडा घालणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय. `स्पेशल २६` या सिनेमातून सात जणांच्या या टोळक्याला ही कल्पना सुचली. धक्कादायक बाब म्हणजे, यातला एक आरोपी खराखुरा पोलीस आहे. २४ ऑगस्टला या नकली सीबीआयनं कयानींच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर कयानींना ब्लॅकमेल करून २१ लाख ३ हजार रुपये उकळले.
‘तुमचा हवाला रॅकेटशी संबंध आहे… तुमच्याकडे काळा पैसा आहे...’ असं सांगत प्रकरण मिटवण्यासाठी लाखो रुपये कयानींकडून उकळण्यात आले. कयानी यांनी आपल्या कर सल्लागाराला याबाबत माहिती दिल्यावर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या तक्रारीवरून निलेश सोनावणे, रुपेश सोनावणे, मनीष ओझा, सुनील कसबे, प्रमोद राठोड, राजेश शिर्के आणि अतुल पाटणकर या आरोपींना पुणे आणि ठाण्यातून अटक करण्यात आलीय.
चित्रपटातील कल्पना प्रत्यक्षात उतरवून लुटमार होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्यात. मात्र, पोलीस दलातीलच कर्मचारी असे प्रकार करत असतील तर ते गंभीर आहे. कुंपणाचं शेत खाल्ले तर तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल उपस्थित होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.