शिक्षिका झाल्या नगरसेविका, विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा

पुणे महापालिकेतील दोन नगरसेविकांना आपल्या मूळ कामाचा विसर पडला. या दोघीही शिक्षिका आहेत. त्याही एकाच संस्थेत. दोघीही काही दिवस वर्षनुवर्षे रजेवर आहेत... अखेर वैतागलेल्या संस्थेनं त्यांना निलंबित केलंय. या दोन नगरसेविकांच्या राजकारण प्रेमाची आणि त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांची होणाऱ्या परवडीची ही गोष्ट....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 24, 2012, 09:08 PM IST

www.24taas.com, पुणे
पुणे महापालिकेतील दोन नगरसेविकांना आपल्या मूळ कामाचा विसर पडला. या दोघीही शिक्षिका आहेत. त्याही एकाच संस्थेत. दोघीही काही दिवस वर्षनुवर्षे रजेवर आहेत... अखेर वैतागलेल्या संस्थेनं त्यांना निलंबित केलंय. या दोन नगरसेविकांच्या राजकारण प्रेमाची आणि त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांची होणा-या परवडीची ही गोष्ट....
राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असलेल्या नगरसेविका अश्विनी कदम यांची ही दुसरी टर्म आहे. कदम राजकारणात नंतर आल्या. आधीच्या त्या शिक्षिका होत्या. होत्या, अशासाठी कि त्या काम करत असलेल्या सेवा सदन संस्थेने त्यांना निलंबित केलंय. कारण राजकारणात आल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ शिक्षकी पेशाचा जवळपास विसरच पडला. २००७ मध्ये कदम नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्या सातत्याने रजेवर आहेत. जुलै २०११ नंतर आजतागायत तर त्या शाळेत फिरकलेल्याच नाहीत. महापालिकेच्या फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या निवडणूक लढवताना तर त्यांनी या सर्वावर कळसच केला.
निवडणूक काळात कदम यांनी रजा घेतली खरी, पण त्यासाठी कारण दिले होते प्रकृती अत्यवस्थ असल्याचे. अत्यवस्थ असलेली व्यक्ती निवडणूक लढवते, प्रचार करते आणि निवडून देखील येते...हे कोडे संस्थेला उलगडले नाही. निवडणूक लढवण्यासाठी अत्यवस्थ असल्याचे कारण देणारी व्यक्ती विद्यार्थ्यांना काय धडे देणार हा प्रश्नही त्यातून पुढे आलाय. त्यातच, पुन्हा नगरसेविका झाल्याने पुन्हा शाळेला दांड्या सुरु होणार हे स्पष्ट होतं...या प्रकाराला कंटाळलेल्या संस्थेनं त्यांना निलंबित केलं.
हाच प्रकार भाजप नगरसेविका मेधा कुलकर्णी यांचा देखील आहे. मेधा कुलकर्णी तर या प्रकारात अश्विनी कदम यांच्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहेत. कारण, नगरसेवक पदाची त्यांनी हॅट्रटीक केलीय. त्यामुळे त्यांच्या रजा देखील जास्त आहेत. किती, तर २००५ पासून म्हणजे तब्बल सात वर्ष या रजेवर आहेत. अखेर संस्थेनं त्यांच्यावर निलंबनची कारवाई केली. संस्थेची ही कारवाई अन्याय करणारी आहे. असं कुलकर्णी याचं म्हणणं आहे.
रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या सेवा सदन संस्थेने शंभरी पार केली आहे. संस्थेच्या वयाप्रमाणे लौकिकदेखील मोठा आहे. मात्र, या दोघी शिकवत असलेल्या विषयात विद्यार्थी नापास होत आहेत. आणि दोघी रजेवर असल्यानं त्यांच्या जागी दुस-या शिक्षकाची नियुक्ती देखील करता येत नाही. त्यामुळं संस्थेची शंभर टक्के निकालाची परंपराही खंडित होत आहे.