...आणि 'लोत्झे-एव्हरेस्ट' मोहीम फत्ते झाली!

माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोत्झे या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केलीय पुणेकरांनी....

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2013, 08:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
समस्त पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोत्झे या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केलीय पुणेकरांनी.... भूषण हर्षे, गणेश मोरे आणि आनंद माळी या मराठी तरुणांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केलीय. उमेश झिरपे यांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेसकॅम्पवर परतावं लागलं. काल पहाटे आशिष मानेनं लोत्झे हे जगातलं चौथ्या क्रमांकाचं उंच शिखर सर करण्याचा पराक्रम केला होता. काल पहाटेच्या सुमारास त्यानं ८ हजार ५१६ मीटर उंचीच्या लोत्झेवर यशस्वी चढाई केली. हे शिखर सर करणारा आशिष माने महाराष्ट्रातला पहिला तर जगातला चौथा गिर्यारोहक ठरलाय.
एवरेस्टवर पुण्यातल्या मराठमोळ्या वीरांनी पाऊल ठेवलंय. एव्हरेस्ट आणि लोत्झेवर गिरीप्रेमींची ही स्वारी कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरलीय. जगातल्या सर्वात उंच शिखरावर पोहोचणं... ही मोहीम सोपी नक्कीच नव्हती. खडतर आव्हानांचा सामना करत या धाडसी वीरांनी हे लक्ष्य पूर्ण केलं. कसा केला या वीरांनी संकटांचा सामना आणि कशी घातली एव्हरेस्टला गवसणी... पाहुयात...
`एवरेस्ट` पृथ्वीतलावरचं सगळ्यात उंच शिखर.....उंची तब्बल ८ हजार ८५० मीटर..... तर एव्हरेस्टशी स्पर्धा करणारं लोत्झे ८ हजार ५१६ मीटर उंचीवर....भारत- तिबेट सीमेवर असणारी ही शिखरं सर करणं सगळ्याच गिरीप्रेमींचं स्वप्न.... हेच स्वप्न उराशी बाळगत २१ मार्च २०१३ ला पुण्यातले उमेश झिरपे, आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे, आणि आशिष माने यांनी पुण्यातून प्रस्थान केलं. 28 मार्चला लुक्ला या नेपाळमधल्या खेड्यातून बेस कॅम्पकडे पायी प्रवास सुरू झाला.
 १५ एप्रिलपासून बेस कँपवर सरावाला सुरुवात झाली. क्षणाक्षणाला बदलणारं हवामान आणि कोसळणारे हिमनग याचा अंदाज येण्यासाठी हा सराव करावाच लागतो.
 १२ मेला पहाटे ४च्या सुमाराला या गिर्यारोहकांनी बेस कॅम्प सोडला. उमेश झिरपे आणि टीमसमोर आव्हान होतं ते खुंबू भागातल्या हिमनद्यांचं... चढाईसाठी अत्यंत अवघड असणाऱ्या या भागामध्ये हिमनग कोसळण्याचा मोठ्या प्रमाणात धोका असतो. या हिमनद्या पार करत झिरपेंची टीम बेस कँप १ ला पोहोचले.
 १४ मे २०१३ ला पहाटे ५ वाजता बेस कॅम्प ३ साठी चढाईला सुरुवात झाली. पुढे ६० ते ७० अंश कोनातली खडी चढण समोर असल्यामुळे इथून पुढे मोहीम अधिक खडतर होत जाते.
 १५ मेला अंतिम टप्प्याच्या चढाईला सुरवात होणार होती. झिरपेंच्या टीमनं एव्हरेस्टकडे तर आशिष मानेंच्या टीमनं लोत्झेकडे कूच केलं. आता लक्ष्य होतं ते समिट पॉईंटला पोहोचण्याचं... ताशी ८० ते ९० च्या वेगानं वाहणारे बोचरे वारे, गोठवणारं तापमान, कमी होत जाणारा ऑक्सिजन... अशा आव्हानांचा सामना करत दोन्ही टीम्स चढाई करत होत्या.
 १६ मे २०१३ ला रात्रभर चढाई केल्यानंतर अखेर सकाळी ७ वाजता आशिष मानेनं लोत्झेवर पाऊल ठेवलं आणि लोत्झे मोहीम यशवी झाली.
 आशिष माने हा लोत्झे सर करणारा महाराष्ट्रातला पहिला तर भारतातला चौथा गिर्यारोहक ठरलाय. खराब हवामानामुळे उमेश झिरपे आणि त्यांच्या टीमला साऊथ कोलला थांबावं लागलं. ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे झिरपेंना साऊथ कोललाच थांबावं लागलं पण आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे, या तिघांनी सकाळी ८ वाजता एवरेस्टवर पाऊल ठेवलं आणि एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाली. एव्हरेस्ट आणि लोत्झेवर मराठी झेंडा फडकला.

पुण्यात एकच जल्लोष
लोत्झे - एवरेस्ट मोहीम फत्ते झाल्यानंतर पुण्यात एकच जल्लोष करण्यात आला. हवामान खराब असल्यानं टीम एव्हरेस्टला शिखर गाठायला नियोजित वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागला. त्यामुळे गीरीप्रेमींमध्ये काही काळ तणाव होता. मात्र सकाळी आठ वाजता एवरेस्ट सर झाल्याची बातमी आली आणि त्याचं रुपांतर जल्लोषात झालं. एकमेकांना पेढे भरवून त्यांनी आनंद साजरा केला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.