www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील मुंढवा येथे पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट मोठ्या बहिणीच्या आणि आजुबाजुला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. दुचाकीवरून आलेले दोघे पाच वर्षांच्या मुलाला घेऊन जाताना त्याच्या मोठय़ा बहिणीने पाहिले आणि त्याच वेळी तिने जोरात आरडाओरडा केल्यामुळे एका नागरिकाने त्यांचा पाठलाग केला. त्याचबरोबर पोलिसांनाही तातडीने कळविले. त्यामुळे तीन मिनिटांमध्ये मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नागरिकांच्या मदतीने मुलाची सुटका करत एका गुन्हेगारास जागेवरच आणि दुसऱ्याला केशवनगर येथून अटक केली.
मुंढवा येथील ‘जॅक अॅन्ड जिल’ शाळेजवळ सोमवारी दुपारी ही घटना घडली. अवघ्या ५ वर्षांच्या सुमीत पारसनाथ प्रसाद या बालकाच्या अपहरणाचा कट रचला गेला होता. मुंढव्यातील `जॅक अॅन्ड जिल` शाळेतून घरी जाताना सुमीत यास दुचाकीवरून आलेले दोन तरुण दुचाकीवर बसवून घेऊन जात होते. त्या वेळी सुमीतच्या मोठी बहिणीने हे पाहिले आणि मोठय़ाने आरडाओरडा केला. त्या वेळी त्या ठिकाणी असलेले आझाद गुलाम चौधरी यांनी त्या दोघांचा पाठलाग केला. तर, श्रीकृष्ण कोद्रे यांनी पोलिसांना फोन केला.
त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी चव्हाण, गांदले त्या ठिकाणी पोहोचले. त्यातील एकाला नागरिकांच्या मदतीने पकडले. आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून दुसऱ्याला काही वेळाने अटक केली, अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी दिलीय.
या प्रकरणी आशिष लालचंद शुक्ला (वय १८) आणि आदित्य शामवैभव चतुर्वेदी (वय २०) या दोन्ही आरोपींना केशवनगर येथून अटक करण्यात आली आहे. सुमीतच्या वडिलांचा लेबर कॉन्टक्ट्ररचा व्यवसाय आहे. हे दोघेही आरोपी केशवनगर भागातील असून त्यातील एकाची सुमीतच्या वडिलांशी ओळख आहे. या दोघांनी दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी सुमीतचे अपहरण करण्याचा कट रचला असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.