www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या खड्ड्यांमुळे अखेर ज्याची भीती होती, तेच झालंय. पुण्यात खड्यांनी दोघांचा बळी घेतलाय. खड्यांमुळे झालेल्या अपघातात गुरबचनसिंग राजपाल आणि प्रशांत मासळकर यांचा मृत्यू झालाय. तर, राजपाल यांचा मुलगा गंभीर जखमी आहे.
हडपसर रस्त्यावर रामटेकडी या भागात पहाटे हा अपघात झाला. राजपाल, मासळकर आणि राजपाल यांचा मुलगा हे तिघं जण पहाटे नारायणपूरहून पुण्यात येत होते. रामटेकडी उड्डाणपुलाजवळ प्रचंड खड्डे पडलेत. त्यातच हे खड्डे बुजवण्यासाठी आणलेले पेव्हर ब्लॉक्स रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले होते.
ते चुकवण्याच्या प्रयत्नात ते बीआरटी मार्गात शिरले. त्याचवेळी समोरून येणा-या एसटी बसनं त्यांच्या इंडिका गाडीला जोरदार धडक दिली. त्यात राजपाल आणि मासळकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळेच झाला, असा घरचा आहेर माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलाय. तसंच महापालिकेच्या अधिका-यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.