एक पूल, तीन दावेदार!

जेधे चौकातील उड्डाण पुलाचं श्रेय कुणाचं, यावरून पुण्यात अनोखं भूमिपूजन नाट्य रंगलंय. भाजपनं मुख्य कार्यक्रमाच्या आधीच तिकाव घालून या पुलाचं भूमिपूजन केलं, तर मुख्य कार्यक्रमात तिकाव घालण्याचं टाळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुसतंच कोनशिलेचं अनावरण केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 20, 2013, 06:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
जेधे चौकातील उड्डाण पुलाचं श्रेय कुणाचं, यावरून पुण्यात अनोखं भूमिपूजन नाट्य रंगलंय. भाजपनं मुख्य कार्यक्रमाच्या आधीच तिकाव घालून या पुलाचं भूमिपूजन केलं, तर मुख्य कार्यक्रमात तिकाव घालण्याचं टाळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुसतंच कोनशिलेचं अनावरण केलं. त्यातच काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनीही हा उड्डाणपूल आपल्याच पाठपुराव्यामुळे साकारला जात असल्याचा दावा केला. त्यामुळे हा पूल म्हणजे, `एक पूल तीन दावेदार` अशी स्थिती निर्माण झालीय.
आम्ही विकासकामाचं राजकारण करत नाही, असं सांगणा-या राजकीय पक्षांचे खरे रंग या कार्यक्रमात पाहायला मिळाले. स्वारगेट जवळच्या जेधे चौकात उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी साडेअकरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार पडणार होता. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याआधीच भूमिपूजन करून
उड्डाणपुलाच्या श्रेयावर दावा सांगितला. स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार गिरीश बापट यांनी या उड्डाणपुलाचं भूमिपूजन केलं.
विरोधी पक्षातील भाजपनं उड्डाणपुलाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यानंतर आघाडीचा भाग असलेला काँग्रेस पक्ष तरी कसा मागे राहणार. या पुलासाठी केलेल्या प्रयत्नांचा पाढाच काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी मुख्य कार्यक्रमाच्यावेळी वाचला.
भूमिपूजनाचा तिकाव गिरीश बापटांनी घातल्यामुळे अजित पवारांनी केवळ कोनशिलेचं अनावरण केलं. विकासकामात राजकारण आणणं गैर असल्याचं सांगत त्यांनी श्रेयाचं राजकारण करणा-यांना चांगलेच चिमटे काढले. पण आपल्या पक्षाच्या भूमिकेबाबत मात्र ते काहीच बोलले नाहीत.
स्वारगेट परिसरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता याठिकाणी उड्डाणपूल होणे आवश्यकच आहे. अर्थात हा उड्डाणपूल पूर्ण होऊन प्रत्यक्ष वापरात यायला आणखी किती काळ लागणार हे माहित नाही. पण त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न आताच सुरु झालाय. म्हणूनच या उड्डाणपुलाचं एकदा नाही तर दोनदा भूमिपूजन झालंय. विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका आता फार लांब नाहीत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.