www.24taas.com, संजय पवार, पंढरपूर
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दागिन्यांच्या चोरीनंतर आणि निकृष्ट प्रसादाची समस्या मांडल्यानंतर विठ्ठल मंदिरातील आणखी एका घोळाचा ‘झी २४ तास’नं पर्दाफाश केलाय. विठठ्लाला भक्तांपासून दान करण्यात आलेल्या देणग्यांतही मोठा घोळ असल्याचं `झी २४ तास`च्या हाती आलेल्या माहितीत उघड झालंय. ‘जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ असं म्हणतात. मात्र, कोट्वधी भाविक दरवर्षी येऊनही विठ्ठल मंदिर देवस्थान इतर देवस्थानांपेक्षा गरीब कसं? या प्रश्नाचं उत्तर नेमकं या अनागोंदी कारभारात दडलंय.
भाविकांच्या वस्तू, देणग्या महिनोंमहिने पोत्यात पडून
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दानपेटीत सावळा गोंधळ सुरु आहे. कुणालाही ऐकून धक्का बसेल, मात्र हे खरं आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यासह देशभरातून अक्षरश: कोट्यवधी भाविक पंढरपुरात येतात. स्वाभाविकच विठ्ठलाच्या चरणी वस्तू आणि येणाऱ्या देणग्याही मोठ्या स्वरुपाच्या असतात. मात्र, श्रद्धेनं येणाऱ्या या दानाबाबत मंदिर प्रशासन गंभीर नसल्याची माहिती `झी २४ तास`च्या हाती लागलीय. खुद्द विधी व न्याय खात्याच्या अहवालातच तसे ताशेरे मारण्यात आलेत.
विठ्ठलाला मिळणारी देणगी कोणताही कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था जमा करतात.
जमा केलेल्या या देणग्या, वस्तू कित्येक दिवस पोत्यांत भरुन ठेवल्या जातात.
जमा झालेल्या वस्तू आणि देणग्यांची योग्य नोंदच ठेवली जात नाही.
त्यामुळेच देणग्यांमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. यासंबंधात विधी आणि न्याय विभागानं केलेल्या तपासणीत भाविकांच्या देणग्या आणि वस्तू तब्बल दोन महिने पोत्यात भरुन असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही पद्धत अयोग्य असल्याचं सांगत, देणग्यांच्या मोठ्या रकमा तातडीनं बँकेत जमा करण्यात याव्यात, तसंच आठवड्यात येणाऱ्या देणग्यांची नोंद ठेऊन, त्याही बँकेत जमा कराव्यात, असे आदेशही देण्यात आले. यात विलंब होता कामा नये, असंही बजावण्यात आलं, मात्र या कानपिचक्यांनतरही कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही.
कोट्यवधी वारकऱ्यांच्या विठ्ठलाच्या दानपेटीतल्या या सावळ्या गोँधळाला मंदिर प्रशासन समितीच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसंच सरकारकडून त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवालही उपस्थित होतोय. शतकोनुशतके विटेवर उभा असलेला विठुराया भक्तांना दर्शन देतोय. कोट्यवधी वारकरीही इथं येतात. मात्र, शिर्डीसारख्या इतर देवस्थानांच्या तुलनेत पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मात्र गरीबच आहे. याचं मूळ कारण मंदिर प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारातच दडलेलं आहे. आलेल्या देणग्यांचा योग्य हिशोब ठेवल्यास आणि त्याचा योग्य वापर झाल्यास याचा फायदा वारकऱ्यांना मिळणार असून, पंढरपुरातील सुविधा यामुळे अधिक चांगल्या होतील. मात्र, हा सावळा गोंधळ थांबणार कधी आणि तो थांबवणार कोण? हाच खरा प्रश्न आहे.